नियमांना बगल देणाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:30 AM2021-03-16T04:30:37+5:302021-03-16T04:30:37+5:30
गोंदिया : राज्य शासनाने खबरदारी म्हणून सर्व जिल्हा प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना ...
गोंदिया : राज्य शासनाने खबरदारी म्हणून सर्व जिल्हा प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी जिल्ह्यात संसर्ग जरी आटोक्यात असला तरी संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या नियमांना बगल देणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. त्यामुळे राज्यात संसर्गाची दुसरी लाट सुरू झाल्याचे चित्र आहे. यावरून राज्य शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची खबरदारी घ्यावी, अशा सूचना केल्या आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकारी गोंदिया यांनी सर्व आस्थापनांच्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर, गर्दी टाळणे या नियमांचे पालन होणे आवश्यक असल्याच्या सूचना केल्या आहेत. ज्या ठिकाणी किंबहुना ज्या व्यक्तीकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांना बगल दिली जात आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचेही निर्देश दिले आहे. त्याचप्रमाणे दंडाची रक्कमही निश्चित करून दिली आहे. दंड व दंडाची कारणे आस्थापनाने मालक किंवा संचालक यांनी मास्क न वापरल्यास ५०० रुपये दंड, खासगी कर्मचाऱ्यांनी मास्क न वापरल्यास २०० रुपये दंड, हॉटेल, रेस्टारंटच्या कर्मचाऱ्यांनी मास्क न वापरल्यास १०० रुपये दंड व मालकास ५०० रुपये दंड, मास्क न वापरणारे सर्वसामान्य नागरिकास १०० रुपये दंड, शासकीय कर्मचाऱ्यांना ५०० रुपये दंड, आस्थापनाच्या ठिकाणी सॅनिटायझर किंवा हात धुण्याची व्यवस्था न ठेवल्यास १ हजार रुपये दंड, कृउबासमध्ये मास्कसह इतर नियम न पाळल्यास सचिवावर १० हजार रुपये दंड व दुकानदार विक्रेत्यास २०० रुपये दंड, ५० पेक्षा अधिक वऱ्हाडी आढळून आल्यास आयोजकावर १० हजार रुपये दंड, गृह विलगीकरणाचे नियम मोडणाऱ्यांवर १० हजार रुपये दंड, याशिवाय एक वेळा दंडात्मक कारवाईनंतर दुसऱ्यांदा उल्लंघन केल्याचे आढळल्यास त्या आस्थापनाच्या ठिकाणाला ७ दिवसांसाठी सील ठोकण्याचे निर्देश दिले आहेत.