लसीकरणासंदर्भात अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:30 AM2021-04-27T04:30:31+5:302021-04-27T04:30:31+5:30
गोंदिया : कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून त्याला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. मात्र काही विघ्नसंतोषी लोक ...
गोंदिया : कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून त्याला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. मात्र काही विघ्नसंतोषी लोक लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण करुन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे अशा अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश खा. सुनील मेंढे यांनी जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आयोजित आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. बैठकीला खासदार अशोक नेते, आमदार डॉ. परिणय फुके, भाजप जिल्हा अध्यक्ष केशवराव मानकर, माजी आमदार गोपाल अग्रवाल, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप कुमार डांगे, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी देशपांडे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन कापसे, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे, गजेंद्र फुंडे, संजय कुलकर्णी उपस्थित होते. खा. मेंढे म्हणाले येत्या १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी ४० प्राथमिक आरोग्य केंद्र, २५८ प्राथमिक उपकेंद्र लसीकरण मोहीम व्यापक स्वरूपात राबविण्यात यावी. कोरोना लसीकरणासंदर्भात सर्वत्र व्यापक जनजागृती करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी खा. मेंढे यांनी दिली.
प्रत्येक कोरोना सेंटरवर रुग्णांसाठी ओपीडीची व्यवस्था सुरू करावी. प्राणवायू व शरीराचे तापमान मोजण्यासाठी ऑक्सिमीटर व थर्मामीटर ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेने पुरवठा करावे, असे सांगितले. जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी यावेळी माहिती देताना सांगितले की दररोज १० हजार नागरिकांना लस देण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. यासाठी संपूर्ण तयारी सुध्दा झाली असल्याचे सांगितले. या दरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने मिळालेल्या व्हेंटिलेटर्सचे वाटप खा. सुनील मेंढे यांच्या हस्ते सेंट्रल हॉस्पिटल, आयुष हॉस्पिटल, हिलिंग ॲण्ड क्रिटिकल हॉस्पिटल या रुग्णालयांना करण्यात आले.