कृषी योजनांचा लाभ घ्या
By admin | Published: June 7, 2017 12:19 AM2017-06-07T00:19:11+5:302017-06-07T00:19:11+5:30
जिल्हा परिषद गोंदिया कृषी विभागामार्फत सन २०१७ खरीप हंगामात जिल्हा निधी योजनेंतर्गत ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना प्रमाणित भात बियाणे-
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा परिषद गोंदिया कृषी विभागामार्फत सन २०१७ खरीप हंगामात जिल्हा निधी योजनेंतर्गत ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना प्रमाणित भात बियाणे- एमटीयू १०१० व हिरवळीचे खत (ढेंचा बियाणे) पंचायत समिती स्तरावर वाटप होणार आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे संपर्क साधून अर्ज व सोबत सातबारा व नमूना-८अ सादर करावे.
जिल्हा निधी अंतर्गत खरीप २०१७ मध्ये डीबीटी नुसार ५० टक्के अनुदानावर रॉकिग स्पेअर नॅपसॅक स्प्रेपंप, बॅटरी आॅपरेटेड नॅपसॅक स्प्रेपंप, किटकनाशके सिंचनपाईप, ताडपत्री, धान उडवणी पंखे आदी साहित्यांसाठी मंजुरी मिळालेल्या शेतकऱ्यांनी खुल्या बाजारातून खरेदी करावयाचा आहे. त्याकरिता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे मंजुरीकरिता अर्ज, सातबारा नमूना-८, आधारकार्ड झेरॉक्स प्रत, राष्ट्रीयकृत बँकेची झेरॉक्सप्रत (आधारकार्डचे लिंक झालेले) सादर करावे.
खरीप हंगाम पूर्व मशागत करताना जमीन नांगरटी करु न धसकटे, गवत, झुडपे जाळून टाकावे. पूर्व मशागत अंतर्गत हेक्टरी २५ ते ३० गाड्या कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत घालावे. पावसाळा सुरू झाल्यानंतर शेतात पाणी साचलेले असताना आडवी व उभी नांगरणी करावी. ढेंचा-बोरु यासारखे हिरवळीचे पीक घेवून जमिनीत गाडावे.
पेरणीपूर्व बीज प्रक्रि या करावी. बीज प्रक्रि येसाठी १० लिटर पाण्यात ३०० ग्राम मीठ (३ टक्के) या प्रमाणात द्रावण करून त्यात बी ओतावे. द्रावण स्थिर झाल्यावर तरंगणारे हलके रोगयुक्त बी चाळणीने काढून जाळून टाकावे. तळातील बी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून सावलीत २४ तास वाळवावे. पेरणी पूर्वी बियाण्यांना थायरम (३ ग्रॅम प्रति किलो) लावून बुरशी नाशकाची प्रक्रि या करावी. सेंद्रीय खते व हिरवळीचे खते यांचा जास्तीत जास्त वापर करावा.
खरीप हंगाम २०१७ सुरु झालेला आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठा खरेदी करताना काळजी घेणे आवश्यक आहे. यात शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठा म्हणजे बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके खरेदी करताना अधिकृत परवानाधारक कृषी केंद्रातून मान्यता प्राप्त कंपनीचे व वाणाचे बियाणे घ्यावे.
बियाणे खरेदी करताना बॅगवर टॅग लावलेले आहे किंवा नाही हे तपासून घ्यावे. बियाणांच्या बॅगवर सिंगल टॅग म्हणजे सत्यदर्शक व डबल टॅग म्हणजे प्रमाणित बियाणे असते. बियाणांच्या बॅगवर लावलेल्या/छापील टॅगवर लॉट नंबर, अंतिम वापर दिनांक व इतर माहिती नमूद आहे किंवा नाही हे तपासून घ्यावे.
खरेदी केलेल्या कृषी निविष्ठाचे पक्के बिल कृषी केंद्र संचालकाकडून प्राप्त करु न घ्यावे व बिलामध्ये लॉट नंबर/बॅच नंबर, प्रती नग किंमत नमूद आहे किंवा नाही हे तपासून घ्यावे. बियाणाच्या पिशवीसह टॅग व पक्के बिल हंगाम संपेपर्यंत सांभाळून ठेवावे. कृषी निविष्ठाच्या बॅग/कंटेनरवर छापील किंमतीपेक्षा जास्त रक्कम अदा करु नये. रासायनिक खते खरेदीसाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड आणणे आवश्यक आहे. कृषी निविष्ठाबाबत कोणतीही तक्र ार असल्यास तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी पंचायत समिती किंवा कृषी विभाग जिल्हा परिषद गोंदिया कार्यालयात संपर्क साधावा. जि.प. कृषी विभाग नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे कृषी विकास अधिकारी वंदना शिंदे यांनी कळविले आहे.