गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:20 AM2021-06-19T04:20:13+5:302021-06-19T04:20:13+5:30
अर्जुनी-मोरगाव : शेती करताना किंवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा अपघात होऊन अपंगत्व किंवा मृत्यू झाल्यास त्या शेतकऱ्याला अथवा त्याच्या ...
अर्जुनी-मोरगाव : शेती करताना किंवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा अपघात होऊन अपंगत्व किंवा मृत्यू झाल्यास त्या शेतकऱ्याला अथवा त्याच्या वारसाला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ देण्यात येतो. याकरिता तालुक्यातील शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे कृषी विभागाने कळविले आहे.
राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा शॉक बसणे आदी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारा अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीच्या झालेल्या अपघातामुळे कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता स्वतंत्र विमा योजना नसल्यामुळे शासनाने सन २००५-०६ पासून शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना कार्यान्वित केलेली आहे. सन २०१५-१६ मध्ये ही गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या कार्यामध्ये व्यस्त आहेत. शेती व्यवसाय करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ घ्यावा, योजनेच्या माहितीसाठी जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
बॉक्स
या योजनेअंतर्गत मिळते संरक्षण
योजनेअंतर्गत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपयाचे संरक्षण, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात, पाय, तसेच एक डोळा, एक हात, पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपयाचे, अपघातामुळे एक डोळा अथवा एक पाय निकामी झाल्यास १ लाख रुपये विमा संरक्षणापोटी शेतकरी अथवा त्याच्या वारसाला दिले जाते.