आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घ्या
By admin | Published: May 7, 2017 12:17 AM2017-05-07T00:17:34+5:302017-05-07T00:17:34+5:30
आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर सारख्या उपकरणांचे खुप महत्व आहे.
सहषराम कोरोटे : भागी येथील आदिवासी समाजाचा विवाह सोहळा
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर सारख्या उपकरणांचे खुप महत्व आहे. या उपकरणांच्या माध्यमातून आपण तासभराचे काम मिनिटांत करु शकतो. याकरिता गरज आहे ती फक्त आधुनिक तंत्रज्ञानाची. आज शासनाच्यावतीने प्रत्येक शहर व गावात ‘स्मार्ट इंडिया-डिजीटल इंडिया’ योजनेचा वाजागाजा सुरू आहे. ही योजना पूर्णपणे साकार करायची असेल तर सर्व समाजांप्रमाणे आदिवासी समाजातील युवक-युवतींनी आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांनी केले.
तालुक्यातील ग्राम भागी (चिचगड) येथे आदर्श आदिवासी सामूहिक विवाह समितीच्यावतीने रविवारी (दि.३०) आयोजीत आदिवासी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या विवाह सोहळ्याचे उद्घाटन क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी आमदार रामरतन राऊत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष डॉ. नामदेवराव किरसान, आदिवासी हलबा-हलबी समाज संघटनेचे अध्यक्ष श्रावण राणा, सभापती हिरालाल फाफनवाडे, जि.प उपमुख्य कार्यपालन अधिकारी राजकुमार पुराम, आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनाग, जि.प. सभापती देवराज वडगाये, गटशिक्षणाधिकारी वाय.सी. भोयर, प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी, जि.प. सदस्य अल्ताफ हमीद, सभापती तानेश ताराम, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रमोद संगीडवार, मोतीलाल पिहदे, दिपक शर्मा, माजी सरपंच प्रेमचनद गुप्ता, माजी उपसभापती प्रभाकर कोल्हारे, तालुका काँग्रेसचे महासचिव बळीराम कोटवार, माजी सरपंच धनपत भोयर, सिमा कोरोटे, माजी जि.प. सदस्य मिना राऊत आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना कोरोटे यांनी, ज्याप्रमाणे इतर समाजात युवक-युवतींनी उच्चशिक्षण घेवून औद्योगिक क्षेत्रात आपल्या शिक्षण व अनुभवाचा वापर करुन आपला व आपल्या समाजाच्या विकासात हातभार लावत आहे.
त्याचप्रमाणे आदिवासी हलबा-हलबी समाजातील युवक-युवतींनी त्यांच्यासोबत स्पर्धा करुन त्यांच्या बरोबर येण्यासाठी प्रयत्न करावे. जेणेकरुन आपल्या समाजाच्या आर्थिक परिस्थितीत वाढ होण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले. संघटक प्रेमलाल कोरोंडे यांनी मानले. प्रास्ताविक विवाह समितीचे अध्यक्ष विठ्ठल भोयर यांनी मांडले. संचालन विवाह समितीचे सचिव मधुकर कुरसुंगे यांनी केले.
३१ जोडप्यांचे शुभमंगल
या सामूहिक विवाह सोहळ्यात ३१ जोडप्यांचे शुभमंगल लावण्यात आले. तर य जोडप्यांना सहसरम कोरोटे व त्यांच्य पत्नी सिमा यांच्या हस्ते भेट म्हणून सिलिंग फॅन वितरीत करण्यात आले. या विवाह सोहळ्यात भागी (चिचगड) परिसरातील गावागावातून आदिवासी समाजाचे सेकडो महिला-पुरुष व युवक मंडळी प्रामुख्याने उपस्थित राहून नव दम्पत्यांना आशीर्वाद दिला.