आरोग्याची काळजी व आत्मरक्षणाचे धडे घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:25 AM2018-03-21T00:25:50+5:302018-03-21T00:25:50+5:30
दुर्गम भागातून आदिवासी समाजातील मुली शिक्षणासाठी आश्रमशाळेत येतात. शिक्षणासोबत वात्सल्य व प्रेमासोबत पालकांनी आपल्या मुलामुलींना समान वागणूक आणि शिकवण द्यावी. त्यामुळे येणाऱ्या पुढील पिढीतील स्त्रियांना पुरुषांकडून अधिक सहकार्य मिळेल.
ऑनलाईन लोकमत
देवरी : दुर्गम भागातून आदिवासी समाजातील मुली शिक्षणासाठी आश्रमशाळेत येतात. शिक्षणासोबत वात्सल्य व प्रेमासोबत पालकांनी आपल्या मुलामुलींना समान वागणूक आणि शिकवण द्यावी. त्यामुळे येणाऱ्या पुढील पिढीतील स्त्रियांना पुरुषांकडून अधिक सहकार्य मिळेल. त्याचबरोबर बौध्दीक विकास व व्यक्तिमत्वाची जडणघडण होईल. आदिवासी समाजातील मुलींनी शिक्षणासोबत आरोग्याची काळजी व आत्मरक्षणाचे धडे घ्यावे, असे प्रतिपादन जि.प. सदस्य उषा शहारे यांनी केले.
देवरीजवळील बोरगाव-बाजार येथे शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आदिवासी आश्रमशाळेत बहुउद्देशिय सभागृहात किशोरी उत्कर्ष कार्यक्रम घेण्यात आले. या वेळी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी प्राचार्य नरेंद्र भाकरे होते. याप्रसंगी मुल्ला प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. लता लांडगे, अधीक्षिका मनिषा काकडे, प्रभारी अधीक्षिका नागलवाडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा सरपंच पुनाराम तुलावी यांच्यासह आश्रमशाळेतील विद्यार्थिनी व गाम्रस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महामानव बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीप प्रज्वलन करण्यात आले. आश्रमशाळेला वेळोवेळी भेट देऊन मार्गदर्शन करणारे जि.प. सदस्य उषा शहारे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. लता लांडगे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
दरम्यान डॉ. लांडगे यांनी आपल्या भाषणात, मुलीची किशोर अवस्था व त्यांच्यात होणारे बदल याबाबत कोणती काळजी घ्यावी याबद्दल वैद्यकीय सल्ला देऊन मार्गदर्शन केले. तर प्राचार्य भाकरे यांनी, मदर टेरेसा, पी.टी. उषा, सायना नेहवाल व किरण बेदी यांच्या विचारांनी विद्यार्थ्यांनी कार्य करावे व त्यांचे गुण अंगिकारावे. तसेच कुटुंबाला एकत्र बांधणारा दुवा आणि बदलत्या जाणिवेची माहिती दिली.
प्रास्ताविक अधीक्षिका मनिषा काकडे यांनी केले. संचालन विलास बारसागडे यांनी केले.
आभार प्रभारी अधीक्षिका नागलवाडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रियंका वरकरे, सोनकुमारी अरकरा, पुष्पा कुंभरे, भानूप्रिया, मनिषा व नंदिनी आदींनी सहकार्य केले.