धान पिकासोबत नगदी पिके घ्या
By admin | Published: January 17, 2016 01:36 AM2016-01-17T01:36:23+5:302016-01-17T01:36:23+5:30
शेतकरी वर्षानुवर्षे धानाचे पीक घेत आहेत. बदलत्या हवामानानुसार दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे.
चांदेवार यांचे प्रतिपादन : शेतकरी प्रशिक्षणात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ुेबोंडगावदेवी : शेतकरी वर्षानुवर्षे धानाचे पीक घेत आहेत. बदलत्या हवामानानुसार दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. पुरेशा जलसिंचनाच्या सोयी-सुविधा नसल्याने एका पाण्याअभावी हाती येणाऱ्या पिकापासून शेतकऱ्यांना मुकावे लागते. धानाच्या उत्पादन खर्चात कमालीची वाढ झाल्याने धानाचे पीक शेतकऱ्यांना मारक ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कर्जपाशातून मुक्ती मिळविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व नगदी पिकाची सांगड घातल्यानेच येणाऱ्या दिवसात शेती फायदेशीर ठरणार असल्याचे उद्गार मंडळ कृषी अधिकारी ऋषी चांदेवार यांनी काढले.
आसोली येथील शेतकरी प्रशिक्षणात ते बोलत होते. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत आयोजित शेतकरी प्रशिक्षणाच्या अध्यक्षस्थानी आसोलीचे सरपंच मुरलीधर रामटेके, प्रमुख अतिथी म्हणून टिकाराम नाकाडे, दुधराम नाकाडे, पोलीस पाटील भिवा नाकाडे, दयाराम काळसर्पे, सखाराम नैताम उपस्थित होते. प्रशिक्षणात मार्गदर्शक म्हणून मंडळ कृषी अधिकारी आर.के.चांदेवार, कृषी पर्यवेक्षक एम.बी.ठाकुर, कृषी सहायक पी.एम.सूर्यवंशी, भारती येरणे यांची उपस्थित होते.
कृषी विभागाच्या वतीने आयोजित शेतकरी प्रशिक्षणाला शेतकऱ्यांसह महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. पुढे चांदेवार म्हणले, आजच्या वाढत्या महागाईत धानाची शेती परवडण्याजोगी नाही. काही ठिकाणी पाण्याची उपलब्धता असून सुध्दा फक्त भातपिकाचीच लागवड होते. भाताच्या पिकावर अवलंबून न राहता ऊस, केळी, मका अशी नगदी पिकांकडे वळून प्रयोगशिल व्हावे. नवनवीन तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये उपयोग करावा नवनवीन पिके घेण्यासाठी शेड-नेट हाऊस, पॅक हाऊस तयार करणे काळाची गरज आहे.
कृषी पर्यवेक्षक एम.बी. ठाकूर म्हणाले, जमीनीमधील माती नमूना कसा काढावा, माती नमूना तपासणीची गरज का? याची विस्तृत माहिती दिली. श्री पध्दत लागवड तंत्रज्ञान किड व रोग यातील फरक त्यावरील नियंत्रण, गादी वाफ्यावरील पेरणीचे महत्व यावर मार्गदर्शन केले. कृषी सहायक पी.एम.सूर्यवंशी यांनी प्रकल्पाबाबत माहिती दिली.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत सधन भात पिक प्रात्यक्षिक प्रकल्पात वाटप करण्यात आलेल्या निविष्ठाचे त्यांनी वाचन केले. शेतकऱ्यांना योजनाविषयी माहिती दिली. भारती येरणे यांनी कृषी विभागाच्या विविध अनुदानित योजनांची माहिती दिली. आसोली हे गाव प्रकल्पासाठी घेण्यात आले होते. यावेळी टिकाराम नाकाडे, भोजराज नाकाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तालुका कृषी अधिकारी डी. एल. तुमडाम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकल्प राबविण्यात आला. संचालन पी.एम.सूर्यवंशी यांनी तर आभार आर.एच.मेश्राम यांनी मानले. आयोजनासाठी कृषी मित्र पतिराम पर्वते, लक्ष्मण नाकाडे, यशवंत गणविर, नामदेव पर्वते यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)