टिल्लूपंप लावणाऱ्यांवर जप्तीची कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:24 AM2021-01-09T04:24:00+5:302021-01-09T04:24:00+5:30
बाराभाटी : जवळील ग्राम येरंडी-देवलगाव येथे ग्रामपंचायतीच्यावतीने अनेक वर्षांपासून लघु नळ पाणीपुरवठा योजना सुरू आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ...
बाराभाटी : जवळील ग्राम येरंडी-देवलगाव येथे ग्रामपंचायतीच्यावतीने अनेक वर्षांपासून लघु नळ पाणीपुरवठा योजना सुरू आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या योजनेतील नळांवर टिल्लू पंप वापरणारे वाढले आहेत. टिल्लू पंप लावून ते पाणी खेचून घेत असल्याने उर्वरित नळधारकांना पुरेसे पाणी मिळत नाही. ग्रामपंचायतीने टिल्लू पंप वापरणाऱ्यांवर जप्तीची कारवाई करण्याची मागणी नळधारकांनी केली आहे.
गावात मागील २५ वर्षांपासून लघु नळ पाणीपुरवठा उत्तमरीत्या सुरू होती; पण या सुरळीत चालणाऱ्या पाणीपुरवठा योजनेवर गावातील काही नळधारकांनी टिल्लू पंप लावले आहेत. परिणामी उर्वरित नळधारकांना पाणी मिळत नसल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. वॉर्ड क्रमांक-३ मध्ये नळांना एकदम कमी प्रमाणात पाणी येते, तर कधी येतच नाही. घरी नळ असूनही नळधारकांना बोअरवेल व विहिरीचे पाणी आणावे लागते अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. टिल्लू पंपच्या अतिरेकी वापरामुळे सार्वजनिक नळ योजना बंद पडली आहे. या प्रकारामुळे गरजूंना सार्वजनिक नळाचा लाभ घेता येत नाही. टिल्लू पंप वापरणारे पाईपलाईनमधील ७० टक्के पाणी खेचून चारचाकी, मोटारसायकल, गुरेढोरे धुण्याचे काम करीत असल्याचे गावात आढळते. ग्रामपंचायतीचे कर्मचारी जाऊन पाहणी करून छायाचित्र काढतात; पण कारवाई केव्हा करणार याकडे लक्ष वेधून आहे. अशा टिल्लू पंप धारकांचे पंप जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आहे.
.....
गावात वारंवार सूचना करूनही टिल्लू पंप वापरणारे ऐकत नाही. आमचे पथक छाप मारून टिल्लू पंप जप्त करून नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
- डब्ल्यू. एम. साकुरे, ग्रामसेवक, येरंडी-देवलगाव.