अदानी पॉवरमध्ये स्थानिक तरूणांना कामावर घ्या
By Admin | Published: June 20, 2017 12:55 AM2017-06-20T00:55:45+5:302017-06-20T00:55:45+5:30
मुद्रा कर्ज व शिक्षण कर्ज देणे यासहच स्थानिक तरूणांना अदानी पॉवर महाराष्ट्र लि.मध्ये रोजगार द्यावे,...
मुद्रा व शिक्षण कर्जाची मागणी : उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
काचेवानी : मुद्रा कर्ज व शिक्षण कर्ज देणे यासहच स्थानिक तरूणांना अदानी पॉवर महाराष्ट्र लि.मध्ये रोजगार द्यावे, या मागण्यांसाठी माजी आ. दिलीप बन्सोड यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शेकडो नागरिकांसह तिरोडाचे उपविभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा केली व निवेदन दिले.
उपविभागीय अधिकारी गंगाराम तलपाले यांच्याशी चर्चा करताना माजी आ. बन्सोड यांनी सांगितले की, पक्षाची सत्ता येण्यापूर्वी बेरोजगार तरूणांना बँकांमार्फत मुद्रा लोन देण्यात येईल, उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिक्षण कर्ज देण्यात येईल, अशा घोषणा करण्यात आल्या होत्या. मात्र आज तीन वर्षे होवूनही बँकांनी कर्ज दिले नाही. त्यांनी तिसरा मुद्दा स्थानिक बेरोजगारी व अदानी पॉवर याबाबतच उचलला व सांगितले की, अदानी पॉवर प्लांटमध्ये स्थानिक बेरोजगार तरूणांना कामावर घेतले जात नाही. तसेच कोणते ना कोणते अनावश्यक कारणे पुढे करून कामावरूनही बंद केले जात आहे. मजुरांना त्रास दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
यावर उपविभागीय अधिकारी तलपाले यांनी अदानी पॉवरचे नितीन शिरोडकर, विविध बँकांचे व्यवस्थापक यांना आपल्या दालनात पाचारण केले. या वेळी आयसीआयसीआय बँकेचे व्यवस्थापक हरिश बिसेन, युनियन बँकेचे व्यवस्थापक व अदानीचे नितीन शिरोडकर प्रामुख्याने उपस्थित होते.
या वेळी उपविभागीय अधिकारी व बँक व्यवस्थापकांनी नागरिकांच्या मागण्या जाणून घेतल्या. मुद्रालोन बँकांमार्फत देण्यासाठी आवश्यक माहिती नागरिकांना समजता यावी, याकरिता तहसील कार्यालयात फार्म उपलब्ध करून देण्यात यावे. उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमानुसार कर्ज देण्यात यावे, असे कळविण्यात आले. यावर मुद्राकर्ज व उच्च शिक्षणासाठी कर्ज देण्यात आले आहे. यानंतर याकडे जातीने लक्ष देवून व गरजूंची माहिती आपल्या निदर्शनास आणूण कर्जाची समस्या सोडविण्याचे आश्वासन युनियन बँकेच्या व्यवस्थापकांनी दिले.
शिष्टमंडळात माजी आ. दिलीप बन्सोड यांच्यासह पं.स. सभापती उषा किंदरले, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रेम रहांगडाले, माजी जि.प. उपाध्यक्ष पंचम बिसेन, पं.स. उपसभापती डॉ. किशोर पारधी, जि.प. सदस्य मनोज डोंगरे, जि.प. सदस्य वीणा बिसेन, प्रीती रामटेके, सुनिता मडावी, पं.स. सदस्य मनोहर राऊत, प्रदीप मेश्राम, नत्थू अंबुले, माया शरणागत, संध्या गजभिये, जया धावळे, ज्ञानिराम डोंगरवार, संजय किंदरले, मुकेश बरियेकर यांच्यासह पदाधिकारी व शेकडो नागरिक उपस्थित होते.
अदानी पॉवरचे तळे बंद पाडणार
तिरोडा तालुक्यातील नागरिकांनी पॉवर प्लांट स्थापित होण्यासाठी खुल्या मनाने सहकार्य केले. याचा विसर अदानी फाऊंडेशनच्या संचालकांना पडला आहे. त्यामुळेच दिवसेंदिवस स्थानिकांसह भेदभाव करून अन्याय केला जात आहे. कंपनीच्या संचालकांनी आपल्या अघोषित कृत्याकडे व चुकीच्या निर्णयाकडे लक्ष केंद्रीत करावे अन्यथा अदानी पॉवरचे तळे बंद करण्याची स्थिती निर्माण करून, असा इशारा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या समोर माजी आ. दिलीप बन्सोड यांनी दिला.
७० टक्के स्थानिक कामावर, ही खोटी बाब
यावेळी माजी आ. दिलीप बन्सोड यांनी सर्वाधिक रोष अदानी पॉवर प्लांटच्या संचालकांवर व्यक्त केला. तेथे स्थानिक बेरोजगार तरूणांना कामावर घेत नाही, अप्रेंटिसमध्ये नियुक्ती करताना बाहेरच्यांना प्राधान्य दिले जाते, स्थानिकांना वेतन कमी देवून त्यांची पिळवणूक केली जाते, वेतनाची मागणी केल्यास त्यांना कामावरून कमी केले जाते, संघटनेत असल्याचे कारण समोर करून कामावरून बंद केले जाते, राजकीय पक्षाची ओळख किंवा संबंध सांगणाऱ्यांना अपमानित करून परत पाठविले जाते, अशा अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. या वेळी अदानी फाऊंडेशनचे संचालक नितीन शिरोडकर यांनी सकारात्मक भूमिका घेत याकडे लक्ष घातले जाईल. स्थानिकांना प्राधान्य दिले जात असून ७० टक्के स्थानिक कंपनीत कामावर असल्याचे सांगितले. मात्र यावर माजी आ. दिलीप बन्सोड व पं.स. सभापती किंदरले यांनी आक्षेप घेवून शिरोडकर खोटे बोलत असल्याचे सांगितले.