रुग्ण वाढीकडे गांभीर्याने पहा, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्या ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:30 AM2021-04-02T04:30:52+5:302021-04-02T04:30:52+5:30
गोंदिया : कोरोना विषाणूचा प्रसार व रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी करण्यावर अधिकाधिक ...
गोंदिया : कोरोना विषाणूचा प्रसार व रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी करण्यावर अधिकाधिक भर द्यावा. यासाठी आवश्यक मनुष्यबळात वाढ करा, असे निर्देश खासदार सुनील मेंढे यांनी गुरुवारी येथे आयोजित आढावा बैठकीत दिले.
गोंदिया पंचायत समिती येथे आज आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. कोरोनासोबतच इतरही विषयांचा खासदारांनी आढावा घेतला. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. ही वाढती संख्या चिंतेचा विषय असून रुग्णांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीने स्वत:हून तपासणी करून घ्यावी, असे खा. सुनील मेंढे यांनी सांगितले. गरज भासल्यास शोधमोहीम राबवून विषाणू वाहकाची तपासणी करावी, असे सांगितले. पंधराव्या वित्त आयोगाच्याअंतर्गत असलेल्या निधीचा वापर करून आरोग्यविषयी काही उपाययोजना राबवता येतील का, या विषयावरही चर्चा करण्यात आली. रोजगार हमी योजनेच्या कामात जास्तीत जास्त मजुरांना काम देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणात घ्यावी त्यासाठी निधीची कमतरता पडणार नाही, अशी ग्वाही मेंढे यांनी दिली. प्रधानमंत्री आवास योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान याचाही आढावा घेण्यात आला. घरकुलासाठी पाच ब्रास रेती मोफत वाटपासाठी यादी तयार असून त्यांना रेती देण्याची कार्यवाही त्वरित करण्याच्या सूचना यावेळी मेंढे यांनी संबंधित विभागाला दिल्या. बैठकीला भाजप जिल्हा महामंत्री संजय कुलकर्णी, संजय टेंभरे, गजू फुंडे, गुड्डू लिल्हारे, धनेंद्र तुरकर, गोल्डी गावंडे, डी. ए. हरीणखेडे, खंडविकास अधिकारी निर्वाण, तालुका आरोग्य अधिकारी वेदप्रकाश चौरागडे उपस्थित होते.