साथरोगांना प्रतिबंध लावण्यासाठी फवारणी व आरोग्य शिबिर घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:30 AM2021-09-25T04:30:41+5:302021-09-25T04:30:41+5:30
गोंदिया : शहरात डेंग्यू, मलेरिया व तापाची साथ पसरली असून शहरवासी दहशतीत वावरत आहेत. अशात नगर परिषदेने शहरात नियमित ...
गोंदिया : शहरात डेंग्यू, मलेरिया व तापाची साथ पसरली असून शहरवासी दहशतीत वावरत आहेत. अशात नगर परिषदेने शहरात नियमित स्वच्छता करावी तसेच कीटकनाशक फवारणी करवून प्रत्येक वॉर्डात आरोग्य तपासणी शिबिर घ्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने केली आहे. यासाठी पक्षाच्या शिष्टमंडळाने नगर परिषद मुख्याधिकारी करण चव्हाण यांना निवेदन दिले.
शहरात डेंग्यू, मलेरिया पाय पसरत असून सोबतच सर्दी, खोकला व तापाची साथ पसरली आहे. मोठ्या प्रमाणात या आजारांचे रुग्ण निघत असून शहरवासी दहशतीत वावरत आहेत. शहरातील स्वच्छतेसाठी कचरागाड्यांची व्यवस्था असूनही स्वच्छता व्यवस्था फिस्कटलेली आहे. पावसाळ्याचे दिवस असूनही नाल्यांची सफाई झालेली नाही. परिणामी, नाले सांडपाण्याने तुंबले असून त्यातून डासांची उत्पत्ती होत आहे. अशात शहरातील सद्य:स्थिती बघता नियमित स्वच्छता करवून आजारांना प्रतिबंध लावण्यासाठी प्रत्येक वॉर्डात कीटकनाशक फवारणी व आरोग्य शिबिर घेण्यात यावे. तसेच आजारांपासून बचावासाठी शहरात औषध वितरण करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसने केली आहे. शिष्टमंडळात विनोद हरिणखेडे, अशोक शहारे, केतन तुरकर, सतीश देशमुख, विनीत सहारे, सुनील भालेराव, सचिन शेंडे, हेमंत पंधरे, विजय रगडे, राजकुमार एन. जैन, खालिद पठाण, प्रतीक भालेराव, छोटू पंचबुद्धे, लव माटे, संजीव राय, दीपक कनोजे, चंद्रकुमार चुटे, सुनील भजे, बसंत बहुजन, सौरभ जैस्वाल, हरिराम आसवानी, एकनाथ वहिले, दर्पण वानखेडे, नागो सरकार, सौरभ रोकडे व अन्य उपस्थित होते.