गैरव्यवहार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:32 AM2021-08-28T04:32:14+5:302021-08-28T04:32:14+5:30
सडक-अर्जुनी : तालुक्यातील घरकूल लाभार्थ्यांसोबत अधिकाऱ्यांकडून गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी आहेत. अशांवर कठोर कारवाई करण्याचे तसेच घरकूल बांधकामासाठी लाभार्थ्यांना ...
सडक-अर्जुनी : तालुक्यातील घरकूल लाभार्थ्यांसोबत अधिकाऱ्यांकडून गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी आहेत. अशांवर कठोर कारवाई करण्याचे तसेच घरकूल बांधकामासाठी लाभार्थ्यांना शासन नियमानुसार वाळू उपलब्ध करवून देण्याचे निर्देश खासदार सुनील मेंढे यांनी दिले.
येथील तहसील कार्यालयात शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला माजी मंत्री राजकुमार बडोले, उपविभागीय अधिकारी मेश्राम व तहसीलदार उषा चौधरी प्रामुख्याने उपस्थित होत्या. बैठकीत खासदार मेंढे यांनी, घरकूल बांधकामासह तालुक्यातील लसीकरण, रोजगार हमी योजना अशा विविध कामांचा आढावा घेतला. रोजगार हमी योजनेत वैयक्तिक लाभाच्या योजना जास्तीत जास्त नागरिकांना देता येतील, तसेच गावाच्या विकासाच्या दृष्टीने कामे करून ते पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी व्यवस्थित नियोजन करण्यासंदर्भात चर्चा झाली. नगरपालिकेच्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधी संदर्भातही माहिती घेण्यात आली. १४ वा वित्त आयोग अंतर्गत नगर पंचायत क्षेत्रात १७ जलशुद्धीकरण यंत्र लावण्याचे काम करण्यात आले त्याबाबत माहिती जाणून घेतली. बैठकीला गटविकास अधिकारी खुणे, नगर पंचायत मुख्याधिकारी मेश्राम, भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भूमेश्वर पटले, तालुका अध्यक्ष अशोक लंजे, विजय बिसेन, गौरव बावनकर, विलास वट्टी, शहर अध्यक्ष विलास बारसागडे, माधुरी पाथोडे, राजेश कठाणे, शिशिर येले, युनूस पठाण, पद्मा परतेकी, कविता रंगारी, चेतन वडगाये तसेच नागरिक उपस्थित होते.