रेती माफीयांवर कठोर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 05:00 AM2020-06-13T05:00:00+5:302020-06-13T05:00:17+5:30
गोंदिया तालुक्यात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज वाहतुकीवर आळा घालण्यासाठी नायब तहसीलदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वातील पथक गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास गस्तीवर असताना रेतीची चोरी करुन वाहतूक करीत असताना कारवाईसाठी गेले असता ट्रॅक्टर, ट्रक चालक व मालकांसह हमालांनी त्यांच्या पथकावर लाठ्याकाठ्यांसह दगडफेक करुन हल्ला केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रेती माफीयांकडून नायब तहसीलदार आणि तलाठ्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना गुरूवारी (दि.११) सकाळी गोंदिया तालुक्यातील तेढवा रेती घाटावर घडली. या घटनेचा विदर्भ तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना शाखा गोंदियाच्यावतीने निषेध करण्यात आला. पथकावर दगडफेक करुन हल्ला करणाºयावर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
गोंदिया तालुक्यात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज वाहतुकीवर आळा घालण्यासाठी नायब तहसीलदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वातील पथक गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास गस्तीवर असताना रेतीची चोरी करुन वाहतूक करीत असताना कारवाईसाठी गेले असता ट्रॅक्टर, ट्रक चालक व मालकांसह हमालांनी त्यांच्या पथकावर लाठ्याकाठ्यांसह दगडफेक करुन हल्ला केला. यात नायब तहसीलदार सचिन पाटील व पथकात असलेल्या तलाठी बुचे, हटवार, राठोड व भोयर हे किरकोळ जखमी झाले.
तसेच खासगी वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या. या हल्ल्यादरम्यानच पथकाने पकडलेले रेतीचे वाहन रेती माफीयांनी बळजबरीने पळवून नेल्याची घटना घडली. याप्रकरणात रावणवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेती माफीयांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याची ही दुसरी घटना असून अशा घटनांना वेळीच पायबंद लावण्यासाठी रेती माफीयांवर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
तलाठी संघटनेने केला निषेध
तेढवा घाटावर रेती माफीयांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर झालेल्या हल्ल्याचा तलाठी संघटनेने गुरूवारी गोंदिया येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एकत्रित येत घटनेचा निषेध नोंदविला. तसेच आरोपींवर कडक कारवाईची आणि पथकाला पोलीस सरंक्षण देण्याची मागणी केली.तेढवा येथील रेती घाटावर काही राजकीय पक्षाच्या वरदहस्ताने सध्या रेतीचा अवैध उपसा सुरू असल्याची चर्चा आहे.