प्रतिभावंत खेळाडूंना संधीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 08:53 PM2018-01-07T20:53:03+5:302018-01-07T20:53:15+5:30
ग्रामीण क्षेत्र ही प्रतिभावान खेळाडूंची खाण आहे. परंतु तेथील खेळाडूंना संधी व मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या प्रतिभा दडपल्या जात आहेत. प्रतिभावंत खेळाडू आणि विशेषत: महिलांना खेळाची संधी उपलब्ध करुन देऊन मागील सात वर्षांपाूसन खेळाडू घडविणाऱ्या ‘भजेपार चषक’....
लोकमत न्यूज नेटवर्क
साखरीटोला : ग्रामीण क्षेत्र ही प्रतिभावान खेळाडूंची खाण आहे. परंतु तेथील खेळाडूंना संधी व मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या प्रतिभा दडपल्या जात आहेत. प्रतिभावंत खेळाडू आणि विशेषत: महिलांना खेळाची संधी उपलब्ध करुन देऊन मागील सात वर्षांपाूसन खेळाडू घडविणाऱ्या ‘भजेपार चषक’ आयोजकांचे कार्य प्रशंसनीय असल्याचे मत हरियाणा स्टालर्स प्रो कबड्डी संघाचे खेळाडू परमोद नरवाल यांंनी शनिवारी (दि.७) येथे व्यक्त केले.
भजेपार येथील सूर्योदय क्रीडा मंडळ, नवयुवक कबड्डी क्लब, संवेदना बहुउद्देशिय संस्था व समस्त ग्रामवासीयांच्या संयुक्त विद्यमाने सालेकसा तालुक्यातील भजेपार येथे भजेपार चषक महिला व पुरुष कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. स्पर्धेचे उद्घाटन आ. संजय पुराम यांच्या हस्ते, काँग्रेस जिल्हा महासचिव सहेषराम कोरोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सखाराम राऊत, उपसरपंच कैलास बहेकार, उद्योगपती राजू काळे, प्राचार्य सागर काटेखाये, शामलाल दोनोडे, देवराम चुटे, माजी सैनिक अनंतराम कोरे, तंमुस अध्यक्ष कृष्णकुमार चुटे, खुशाल शिवणकर, इसराम बहेकार, संतोष बोहरे, हेतराम शहारे, खुशाल शिवणकर उपस्थित होते.
उद्घाटनाच्या सामन्यात ५० ते ५५ वर्षावरील ज्येष्ठ खेळाडुंनी कबड्डी खेळून उपस्थितांना चकित केले. ७० ते ७५ वर्षाच्या दोन वयोवृध्द महिलांनी तरुण मुलींसोबत कबड्डी खेळून उपस्थितांचे लक्ष वेधले. याप्रसंगी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी आणि कबड्डीच्या प्रतिभावंत खेळाडूंचा आ. पुराम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तीन दिवसीय कबड्डी स्पर्धेत महाराष्टÑ, छत्तीसगड, मध्य प्रदेशातील ७० पेक्षाही अधिक संघ सहभागी झाले आहे. ८ जानेवारीला रात्री ९ वाजता प्रो. कबड्डी खेळाडू प्रितम छिल्लर व शशांक वानखेडे यांच्या विशेष उपस्थितीत बक्षीस वितरण होणार आहे. प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष चंद्रकुमार बहेकार, संचालन रमसुला चुटे, आभार चंद्रकुमार पाथोडे यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी गावकरी परिश्रम घेत आहेत.