विजेच्या लपंडावामुळे तालुकावासीय त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:18 AM2021-07-12T04:18:46+5:302021-07-12T04:18:46+5:30
देवरी : तालुक्यातील लोहारा, डवकी, बोरगाव, पुराडा, वडेगाव यांसह शहरात गेल्या पंधरवड्यापासून दिवसातून ८-१० वेळा तसेच रात्रीला ३-४ वेळा ...
देवरी : तालुक्यातील लोहारा, डवकी, बोरगाव, पुराडा, वडेगाव यांसह शहरात गेल्या पंधरवड्यापासून दिवसातून ८-१० वेळा तसेच रात्रीला ३-४ वेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. दिवसा वीज गेल्यास सुमारे अर्धा, तर रात्रीला गेल्यास त्यापेक्षाही जास्त वेळ बत्तीगुल होत असल्याने तालुकावासी त्रासले आहेत.
विजेच्या या लपंडावाला घेऊन नागरिक वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन लावून बेजार होत आहे. तरी मात्र नागरिकांचा फोन कोणताही अधिकारी वा कर्मचारी उचलत नाही. अशातच नागरिकांकडे असलेले वीजबिल वसुलीकरिता अधिकारी मात्र तगादा लावत आहे. वीजबिल न भरल्यास त्यांची जोडणी कापली जात आहे. तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात वीज कंपनीचे हिटलरशाही राज्य असल्याने सामान्य जनता मात्र त्यांच्या या हेकेखोरीला चांगलीच कंटाळली आहे. रात्रीला वीज गेल्यास डासांच्या प्रकोपामुळे नागरिक त्रस्त असून, रात्री जागूनच काढावी लागत आहे. मात्र त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला कुणीही तयार नाही. पावसाळ्याच्या दिवसात कुठेही लोडशेडिंग नसताना लोहारा, वडेगाव, पुराडा, बोरगाव, चिचगड येथेच वीज कंपनीची अरेरावी का? याचे उत्तर आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच देऊन वेळीच हे अघोषित लोडशेडिंग बंद करावे. अन्यथा याविरुद्ध नागरिकांच्या असंतोषाचा भडका कधीही उडू शकतो. हे वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावे, अशा इशाराच तालुकावासीयांनी दिला आहे.
----
पथदिवे बंद असल्याने लोहारा अंधारात
लोहारा हे गाव शहरापासून १० किलोमीटर अंतरावर आहे. वीज विभागाने गावातील पथदिव्यांची जोडणी कापली आहे. त्यावरही सलग आठवडाभरापासून वीज विभागाच्या निष्काळजीपणामुळे कोणतीही लोडशेडिंग नसताना अख्खी रात्र विजेची ये-जा सुरू आहे. ग्रामीण भागातील शेतकरी शेतात राबतो व त्यात आता त्याला रात्रीला धोडा आरामही वीजपुरवठा खंडित होत असल्याने नशिबी नाही. हाच प्रकार तालुक्यातील अन्य गावांमध्ये सुरू आहे.
----
जनप्रतिनिधींचे दुर्लक्ष
वीज वितरण कंपनीकडून होत असलेला त्रास तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला सतत सहन करावा लागत आहे. याबाबत जनप्रतिनिधींना संपूर्ण माहिती आहे. अनेकदा तक्रार देऊनही त्यांच्याकडून काहीच केले जात नसल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. यामुळे जनप्रतिनिधींच्या विरोधातही नागरिक रोष व्यक्त करीत आहेत.