तालुक्याला गारपिटीने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 06:00 AM2020-03-14T06:00:00+5:302020-03-14T06:00:13+5:30
निसर्गाने निर्माण झालेल्या संकटाचा तालुक्याला फार मोठा फटका बसला. वादळी वाऱ्यासह पाणी आणि १२५ ग्रॅम एवढ्या वजनाच्या गारांमुळे त्या भागातील वीज पुरवठा खंडित झाला. तर गारपिटीमुळे कौलारुंचे घर आणि रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ज्यामध्ये धान, टरबूज, वांगे, मिरची, काकडी, लौकी, भेंडी या पिकांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक अर्जुनी : तालुक्यातील ग्राम टेमनी, हेटी व गिरोला या गावांना गुरुवारी (दि.१२) सायंकाळी ६ ते ७ वाजताच्या सुमारास झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीचा जोरदार तडाखा बसला. अनेक शेतकऱ्यांच्या शेतमाल आणि घरांचे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.
निसर्गाने निर्माण झालेल्या संकटाचा तालुक्याला फार मोठा फटका बसला. वादळी वाऱ्यासह पाणी आणि १२५ ग्रॅम एवढ्या वजनाच्या गारांमुळे त्या भागातील वीज पुरवठा खंडित झाला. तर गारपिटीमुळे कौलारुंचे घर आणि रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ज्यामध्ये धान, टरबूज, वांगे, मिरची, काकडी, लौकी, भेंडी या पिकांचा समावेश आहे. तालुक्यात झालेल्या पाऊस व गारपिटीमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची ही प्रथमच वेळ आहे. शेती आणि घरांची अक्षरश: चाळणी झाली. कृषी अधिकारी किशोर पात्रीकर यांनी घटनास्थळी जावून आपद्ग्रस्त शेतकऱ्यांची मौका चौकशी सुरु केली आहे.
आंतरराष्ट्रीय शाळेचे नुकसान
गोरेगाव : अवकाळी पावसासह वादळीवाऱ्यामुळे ग्राम हिरडामाली येथील भारतरत्न अटलिबहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेची इमारतीचे नुकसान झाले आहे. गुरूवारी (दि.१२) सायंकाळी ७ वाजतादरम्यान आलेल्या वादळी वारा व पावसामुळे शाळेतील स्वयंपाक गृह, प्रसाधन गृह व वर्ग खोल्यांचे छत उडून गेले आहे.
शाळा प्रशासनाच्यावतीने सुमारे एक लक्ष रूपयांचे नुकसान झाले असल्याचे घोषित करण्यात आले. या आर्थिक नुकसानीची भरपाई शासनाने करावी अशी मागणी संबंधितांना करण्यात येईल असे शाळा प्रशासनाने कळविले आहे. विशेष म्हणजे, तालुक्यातील काही भागात वीज पुरवठा गुरूवारपासून खंडीत होता.
रब्बी पिकांचे नुकसान
नवेगावबांध : परीसरात गुरूवारी (दि.१२) सायंकाळी ६.३० वाजतादरम्यान वादळी वाऱ्यासह आलेल्या पाऊस व गारपिटीने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या चहाटपऱ्याही उडून गेल्यातर मोठी झाडेही उन्मळून कोसळली. या पाऊस व गाटपीटमुळे चना, गहू, तुर, उडीद, मुंग, मसूर आधी रब्बी पीक मातीमोल झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीचे लगेच पंचनामे करुन त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा सूचना केल्या आहेत.
- मनोहर चंद्रिकापुरे
आमदार,अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्र
................................
वादळीवारा व गारपिटीची सकाळीच प्रत्यक्ष गावात जावून पाहणी केली. हातात आलेल्या पिकांचे आणि घरांच्या नुकसानीची भरपाई शासनाने द्यावी.
-रमेश चुऱ्हे, जि.प.सदस्य
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे परिसरात असलेले जवळपास १५० विद्युत खांब पडल्याने त्या गाव व परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. एवढे मोठे नुकसान यावर्षी प्रथमच झाले.
- जी.पी. काकडे, शाखा अभियंता, वीज वितरण विभाग
................................
आम्ही लहानपनापासून तर आज ५० वर्ष पर्यंत ऐवढी मोठी गारपीट कधीच पाहिलेली नाही. टिनाचे छत उडाले, घरांचे कवेलू फुटले. आम्ही आमच्या जीव मुठी घेवून रात्र काढली. आता नैसर्गिक वातावरणात आम्ही जिवंत राहतो की नाही अशी अवस्था झाली होती.
-लक्ष्मीकांत बिसेन, नागरिक, टेमनी