दारूबंदीसाठी तंमुसचा एल्गार
By admin | Published: October 6, 2015 02:24 AM2015-10-06T02:24:17+5:302015-10-06T02:24:17+5:30
महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पर्वावर गावात शांतता व सुव्यवस्था रहावी, दारूच्या व्यसनामुळे अनेकांची उद्वस्त होणारी
सागर काटेखाये ल्ल साखरीटोला
महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पर्वावर गावात शांतता व सुव्यवस्था रहावी, दारूच्या व्यसनामुळे अनेकांची उद्वस्त होणारी कुटुंबे व त्यातून निर्माण होणारी समस्या दूर व्हावी या उदात्त हेतूने गांधीटोला तसेच मक्काटोला येथील तंटामुक्त समितीने विशेष अभियान म्हणून गावात संपूर्ण दारूबंदी करण्याचा निर्धार केला. गावकऱ्यांनीही दारूबंदीचा एल्गार पुकारला आहे.
सालेकसा तालुक्यातील गांधीटोला ग्रामपंचायत व मक्काटोला ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी तंटामुक्त समितीने २ आॅक्टोबर रोजी सभा घेवून गावात दारूबंदी करण्यासाठी ठराव पारित केला. त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून तळीरामांचीसुद्धा चांगलीच पंचाईत झाली आहे. गांधीटोला ग्रामपंचायत अंतर्गत भजियादंड, सालईटोला, चर्जेटोला या गावांचा समावेश आहे. तर मक्काटोला ग्रामपंचायत अंतर्गत दुर्गुटोला गावाचा समावेश आहे.
भजियादंड, दुर्गुटोला व गांधीटोला येथे काही लोक अवैधरित्या दारूची विक्री करतात. त्यामुळे अनेक लोक दारूच्या आहारी गेले आहेत. याचा परिणाम गावाच्या शांततेवर होत होते. तसेच दारूच्या व्यसनामुळे काहींचे संसार उद्धवस्त होण्याच्या मार्गावर होते. ही बाब लक्षात घेवून गांधीटोला येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुरेंद्रसिंग बैस यांनी गावकऱ्यांना विश्वासात घेवून गांधी जयंतीच्या पर्वावर सभा घेवून गावात दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला.
गांधीटोला येथे दारूबंदीविषयी जनजागृती करण्यात आली. मक्काटोला येथेसुद्धा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रामप्रकाश दोनोडे यांच्या अध्यक्षतेखाली मोहीम हाती घेण्यात आली असून अवैध दारूविक्रेत्यांवर आळा बसला आहे.
या मोहिमेत पंचायत समितीचे माजी सभापती तुकाराम बोहरे, प्रेमलाल फुंडे, रूपचंद खांडवाये, राजेश शहारे, रमेश अग्रवाल, खेमराज गायधने, मुकेश शेंडे, प्रेमलाल मुनेश्वर, जैतराम कुतीर, पारथ बैस, उत्तम चर्जे, देवराम मेंढे, राहुल कोरे, सेवक अंबादे, नागोराव बहेकार, मनोज शहारे, नाना टेंभुर्णीकर, रवी बडोले, करूणा शहारे, पुष्पा बघेले, क्रिकेट चमूचे सर्व युवक व गावकरी यांचा समावेश आहे.
दारूबंदीसाठी जनजागृती रॅली
४रविवारी ४ आॅक्टोबरला गांधीटोला ते मक्काटोलापर्यंत रॅली काढून दारूबंदीविषयी जनजागृती करण्यात आली. विशेष म्हणजे आंबट शौकिनांना दारू पिण्यापासून परावृत्त करून दारूबंदी मोहिमेत समाविष्ट करून घेण्यात आले. त्यामुळे गावात दारूबंदीचे वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.