आई-वडिलांच्या कष्टाचे चीज, टपरी चालकाचा मुलगा झाला 'सीए'!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 12:08 PM2023-07-13T12:08:32+5:302023-07-13T12:08:58+5:30
रिसामा येथील तरुणाने ठेवला आदर्श
आमगाव (गोंदिया) : प्रयत्नांती परमेश्वर असे म्हटले जाते. ही बाब प्रत्यक्षात कृतीत आणणारे अनेक तरुण आहेत. आपल्या परिस्थितीची आणि आई-वडिलांनी आपल्या शिक्षणासाठी घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेवून अधिक परिश्रम घेऊन त्यांच्या कष्टाची फुले करण्याचा प्रयत्न काही तरुण करतात. सीए होण्याची जिद्द मनाशी बाळगून ते स्वप्न गाठण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणाला अखेर यश आले आहे. टपरी चालकाच्या मुलाने चार्टर्ड अकाऊंटंटची (सीए) परीक्षा उत्तीर्ण होत इतर विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवला असून, आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले आहे.
आमगाव तालुक्यातील रिसामा येथील अवि मनोहर मेंढे असे सीए झालेल्या तरुणाचे नाव आहे. मे २०२३ मध्ये द इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाऊंटंट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत रिसामा येथील मनोहर मेंढे यांचा मुलगा अवि मेंढे याने परीक्षा उत्तीर्ण करून केवळ मेंढे परिवाराचेच नव्हे तर संपूर्ण गावाचा नावलौकिक केला. अविचे वडील मनोहर मेंढे यांचे आमगाव येथील आंबेडकर चौकात छोटेसे चहा-नाश्त्याचे दुकान आहे. आपण आयुष्यभर जे कष्ट उपसले ते आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नयेत. त्यांनी खूप शिकावं, मोठं व्हावं यासाठी त्यांनी मुलांच्या शिक्षणात कुठलीच कमतरता भासू दिली नाही. तर मुलानेही उच्च शिक्षण घेण्यासाठी दिवस-रात्र परिश्रम घेत आमच्या कष्टाचे फलित केल्याचा आनंद असल्याचे मनोहर मेंढे यांनी सांगितले.
उडाण संस्थेने केला सत्कार
देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेली सीएची परीक्षा अवि मेंढे याने उत्तीर्ण केली. याबद्दल त्याचा उडाण संस्थेचे अध्यक्ष आशिष तलमले, नरेश रहिले, नरेश मेश्राम, निखिल उके, सौरभ कोरे, राकेश चुटे, नरेश बोहरे, दीप मेंढे यांनी सत्कार केला. यावेळी वडील मनोहर मेंढे, आई आनंदा मेंढे, भाऊ रवी मेंढे, गीता मेंढे व पूनम थेर, विनोद थेर उपस्थित हाेते.
मला कुठल्या क्षेत्रात जायचे हे मी आधीच ठरविले होते. सीए अभ्यासक्रमाची निवड करून त्यात यशस्वी होण्यासाठी तयारी सुरू केली. नियमित आठ ते दहा तास अभ्यास केला. हे सर्व करत असताना आपली परिस्थिती आणि आई-वडील आपल्यासाठी घेत असलेल्या कष्टांची जाणीव होती. या सर्व गोष्टींमुळेच मी सीएची परीक्षा उत्तीर्ण करू शकलो.
- अवि मेंढे, सीए परीक्षा उत्तीर्ण तरुण