टार्गेट ९.३५ कोटी रूपयांच्या कर वसुलीचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 09:26 PM2018-12-17T21:26:41+5:302018-12-17T21:26:57+5:30
मालमत्ता कर वसुलीचा काळ जवळ येत असून नगर परिषदेचे टेंशनही वाढू लागले आहे. यंदा नगर परिषदेला मागील थकबाकी व यंदाची मागणी असे मिळून एकूण ९ कोटी ३५ लाख ४४ हजार ४४८ रूपयांचे टार्गेट आहे. असे असतानाच यंदा किमान ८० टक्के कर वसुलीचे निर्देश कर विभागाला देण्यात आले आहे. त्यादृष्टीने नगर परिषद कामाला लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मालमत्ता कर वसुलीचा काळ जवळ येत असून नगर परिषदेचे टेंशनही वाढू लागले आहे. यंदा नगर परिषदेला मागील थकबाकी व यंदाची मागणी असे मिळून एकूण ९ कोटी ३५ लाख ४४ हजार ४४८ रूपयांचे टार्गेट आहे. असे असतानाच यंदा किमान ८० टक्के कर वसुलीचे निर्देश कर विभागाला देण्यात आले आहे. त्यादृष्टीने नगर परिषद कामाला लागली आहे.
नगर परिषदेला सर्वात जड काम म्हणजे कर वसुलीचे आहे. भल्या भल्यांकडे मोठाली रक्कम थकून बसल्याने कर वसुली विभागाची डोकेदुखी वाढते. अशात यंदा नगर परिषदेला मागील थकबाकी ४ कोटी ८६ लाख ६५ हजार ३१७ रूपये व चालू मागणी ४ कोटी ४८ लाख ७९ हजार १३१ रूपये असे एकूण ९ कोटी ३५ लाख ४४ हजार ४४८ रूपये कर वसुलीचे टार्गेट आहे.
यामुळे आतापासूनच कर विभागच काय नगर परिषदेचे टेंशन वाढले आहे. त्यामुळे नगर परिषद आतापासूनच कर वसुलीच्या नियोजनासाठी कामाला लागली आहे.
विशेष म्हणजे, कर वसुली विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे मागील वर्षी नगर परिषदेला चांगलाच फटका सहन करावा लागला. मागील वर्षी नगर परिषदेला ९ कोटी २० लाख २६ हजार १२५ रूपयांचे टार्गेट होते. मात्र कर विभागाकडून फक्त ४ कोटी ४९ लाख ४६ हजार २०२ रूपयांची म्हणजेच फक्त ४८ टक्केच वसुली करण्यात आली होती. त्यामुळे यंदातरी मागील वर्षी झालेल्या नुकसानाची भरपाई करता यावी यासाठी नगर परिषद आतापासूनच नियोजन करीत आहे.
मोहरीलना दिले ८० टक्के कर वसुलीचे पत्र
मागील वर्षी खूपच कमी कर वसुली झाल्याने नगर परिषद धास्तावली आहे. त्यामुळे यंदा नगर परिषदेने यंदा सर्व मोहरीलना ८० टक्के कर वसुलीबाबत पत्र दिले आहे. आतापासूनच नियोजन केल्यास हे शक्य असल्याने नगर परिषद कामाला लागली आहे. ८० टक्के कर वसुली न झाल्यास मोहरीलची दोन वेतनवाढ थांबविण्यात येणार असल्याचेही पत्रातून स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, कर वसुली वाढविण्यासाठी बाजार निरीक्षक मुकेश मिश्रा व वरिष्ठ लिपीक श्याम शेंडे यांना कर वसुलीची अतिरीक्त जबाबदारी देण्यात आली आहे.
वसुलीसाठी ८ जणांचे पथक गठित
कर वसुलीसाठी नगर परिषद कर विभागाने आताच कर विभागातील ८ जणांचे पथक गठीत केले आहे. यात, सहायक कर निरीक्षक पी.के.खोब्रागडे, बाजार निरीक्षक मुकेश मिश्रा, वरिष्ठ लिपीक श्याम शेंडे, घोडेस्वार, संतबहादुर सोमवंशी, शेखर शर्मा, संजय चौबे, जगदीश गाते यांचा या पथकात समावेश करण्यात आला आहे.