मसाल्यांचे भाव वधारल्याने जेवणाची चवच हरपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:32 AM2021-08-20T04:32:53+5:302021-08-20T04:32:53+5:30
गोंदिया : चटपटीत व चविष्ट जेवणासाठी वापरात येत असलेल्या मसाल्यांवरही महागाईचा फटका असल्यामुळे आता जेवणाची चवच हरपली आहे. मसाल्यात ...
गोंदिया : चटपटीत व चविष्ट जेवणासाठी वापरात येत असलेल्या मसाल्यांवरही महागाईचा फटका असल्यामुळे आता जेवणाची चवच हरपली आहे. मसाल्यात वापरण्यात येणाऱ्या पदार्थांचे दर एकदमच झपाट्याने वधारले असून परिणामी मसाला खरेदी करणे किंवा मसाला तयार करणे सर्वसामान्यांना न परवडणारे ठरत आहे. मात्र जेवणात मसाले टाकल्याशिवाय चव येत नसल्याने नामर्जीने का असोना मसाले खरेदी करावेच लागतात. यामुळे मसाल्यांचे दर अधिकच वधारत आहेत. मसाल्याचे दर आवाक्या बाहेर गेल्याने जेवणाची चव गेली आहे.
------------------------------
असे वाढले दर
मसाला जुने दर नवीन दर
जायपत्री २५०० २८००
कर्णफूल ६०० १४००
वेलची २६०० २०५०
मोठी वेलची ५५० ८००
काळी मिरी ५५० ७५०
जिरे १८० २००
लवंग ५५० ६५०
कलमी ६०० ८००
------------------------------
महागाई पाठ सोडेना !
आजघडीला महागाईचा भडका उडाला असून प्रत्येकच वस्तूंचे भाव वधारले आहे. यामुळे मात्र सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. भाजीपाला व किराणा वस्तूंचे दर वधारले असतानाच आता मसाल्याचे दर भडकले आहेत. अशात स्वयंपाकात आता मसाल्यांचा वापरही जपूनच करावा लागत आहे.
- सविता डोये (गृहिणी)
--------------------------
भाजीपाला व किराणा वस्तूंची दरवाढ झाल्याने जेवणाचा प्रश्न निर्माण झालेला असतानाच आता मसाल्याचे दर वधारले आहेत. यामुळे स्वयंपाकात चव आणण्यासाठी मसाले टाकणेही कठीण झाले आहे. महागाइमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- हिमेश्वरी कावळे (गृहिणी)
--------------------------------
म्हणून वाढले दर
मसाला पदार्थांची आवक परदेशातून होत असून दिल्ली येथून आपल्याकडे हा माल येतो. आयात शुल्कातील दरवाढ झाली आहे. त्यानंतर आता पेट्रोल-डिझेलची दरवाढ यामुळे मसाला पदार्थांचे दर चागलेच भडकले आहे.
- अंकित खटवानी (व्यापारी)
---------------------
देशात बहुतांश मसाल्याचे पदार्थ परदेशातून मागविले जातात. त्यानंतर त्यांचे देशांतर्गत वितरण केले जाते. आता आयात शुल्क वाढले असून सोबतच देशात पेट्रोल-डिझेलची सातत्याने दरवाढ होत आहे. याचा परिणाम पडत आहे.
- संजय अमृते (व्यापारी)