कर वसुलीचे ‘काऊंटडाऊन’ सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 09:42 PM2018-02-03T21:42:16+5:302018-02-03T21:42:31+5:30
नगर परिषदेच्या कर वसुलीचे काऊंट -डाऊन सुरू झाले असून यंदा नगर परिषदेला मागील थकबाकी व मागणी असे मिळूण एकूण नऊ कोटी २० लाख २६ हजार १२५ रूपयांचे टार्गेट आहे. त्यात नगर परिषदेची आतापर्यंत २ कोटी ३४ लाख ३० हजार ३८७ रूपयांची कर वसुली झाली आहे.
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : नगर परिषदेच्या कर वसुलीचे काऊंट -डाऊन सुरू झाले असून यंदा नगर परिषदेला मागील थकबाकी व मागणी असे मिळूण एकूण नऊ कोटी २० लाख २६ हजार १२५ रूपयांचे टार्गेट आहे. त्यात नगर परिषदेची आतापर्यंत २ कोटी ३४ लाख ३० हजार ३८७ रूपयांची कर वसुली झाली आहे. उद्दिष्टय गाठण्यासाठी नगर परिषदेला ५६ दिवसात बरीच कसरत करावी लागणार आहे.
मागील आठ दहा वर्षांपासून थकीत मालमत्ता कर वसुलीची समस्या नगर परिषदेसाठी चांगलीच डोकेदुखीची ठरत आहे. यंदा नगर परिषदेला मागील थकबाकी व चालू मागणी असे एकूण ९.२० कोटी रूपये कर वसुलीचे टार्गेट आहे. मागील वर्षापासून राज्य शासनाकडून शंभर टक्के कर वसुलीचा फतवा काढला जात असल्याने नगर परिषदेची चांगलीच गोची होत आहे. शंभर टक्के कर वसुली अशक्य असतानाही कर वसुली विभागाचे कर्मचारी मात्र थकबाकीदारांकडे जाऊन जास्तीत जास्त कर वसुली करीत आहेत. यातूनच जानेवारीपर्यंत २.३४ कोटींची कर वसुली झाली. त्याची २५.४६ एवढी टक्केवारी आहे. फेब्रुवारी महिन्याला सुरूवात झाली असून कर वसुलीसाठी हा महत्त्वाचा कालावधी समजला जातो. आतापासूनच कर वसुली विभाग तत्परतेने कामाला लागला असल्याने यात त्यांना उद्दिष्टय गाठण्यात कितपत यश येते हे येणार काळच सांगेल. त्यामुळे फेब्रुवारी महिना लागताच कर वसुलीचे काऊंट- डाऊन सुरू होते. त्यानुसार यंदाही कर वसुली विभागाचे कर्मचारी कर वसुलीच्या कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे, तत्कालीन मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी त्यांच्या कार्यकाळात कर वसुलीदरम्यान मालमत्ता सीलींगची कारवाई केली.
मुनादी देऊन शहरवासीयांना आवाहन
कर वसुलीची मोहीम आता सुरू झाली असून शहरवासीयांनी कराचा भरणा करून नगर परिषदेला सहकार्य करावे. यासाठी नगर परिषदेकडून मुनादी केली जात आहे. शहरातील प्रत्येकच सर्वच भागात रिक्शा फिरत आहे.
मागील वर्षी ५२ टक्के कर वसुली
मागील वर्षी नगर परिषदेने ५१.५८ टक्के कर वसुली करून रेकॉर्ड केला होता. आतापर्यंतची ही सर्वाधीक कर वसुली आहे. यंदा नगर परिषदेने जानेवारीपर्यंत २५ टक्के कर वसुली केली आहे. तर उरलेल्या ५६ दिवसांत आणखी किती वसुली होते हे कळेलच.