कर वसुली अभियान टाय-टाय फिस्स...
By admin | Published: January 17, 2015 11:00 PM2015-01-17T23:00:37+5:302015-01-17T23:00:37+5:30
शनिवारपासून (दि.१७) सुरू होणारे पालिकेचे कर वसुली अभियान पुन्हा एकदा टाय-टाय फिस्स... झाले आहे. मुख्याधिकारी कामात व्यस्त असल्याने ही मोहीम पुन्हा रखडल्याचे सांगितले जात आहे.
गोंदिया : शनिवारपासून (दि.१७) सुरू होणारे पालिकेचे कर वसुली अभियान पुन्हा एकदा टाय-टाय फिस्स... झाले आहे. मुख्याधिकारी कामात व्यस्त असल्याने ही मोहीम पुन्हा रखडल्याचे सांगितले जात आहे. पालिकेच्या या उदासीन धोरणामुळे ११ कोटींच्या कर वसुलीचे टार्गेट गाठणे दिवसागणिक कठीण होत आहे.
मागील थकबाकी व चालू वर्षातील कर असे एकूण ११ कोटींची कर वसुली पालिकेला करायची आहे. मात्र कर वसुली विभागाकडून वसुली होत नसल्याने कर वसुलीचे डोंगर वाढतच चालले आहे. कर वसुली होत नसल्याने पालिकेला प्राप्त होणाऱ्या शासकीय अनुदानावर प्रभाव पडत असून शिवाय रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुद्धा सुटत नसल्याचे चित्र आहे. तर कर वसुलीच्या या गंभीर प्रश्नाला लक्षात घेत जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी खुद्द एक दिवस पालिकेत घालवून कर विभागातील कर्मचाऱ्यांची क्लास घेतली होती.
यावर पालिकेने कर वसुली अधिकाऱ्यांची मागणी करून कर वसुली सुरळीत करण्याचा विचार केला होता. त्यानुसार आमसभेत ठराव पारित करून कर वसुली अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणीही करण्यात आली. मात्र पालिकेला अद्याप कर वसुली अधिकारी न मिळाल्याने कर वसुली विभाग पूर्णपणे मुख्याधिकाऱ्यांवरच अवलंबून आहे. तर कर वसुली विभागातील हा लेटलतीफ कारभार लोकमतने वेळोवेळी उजेडात आणल्याने पालिका प्रशासनाने कर वसुली अभियान राबविण्याचे नियोजन केले. यासाठी पालिकेने सात सदस्यांचे कर वसुली पथक तयार केले आहे. हे पथक १६ जानेवारीपासून शहरात कर वसुली मोहिम राबविणार होते. मात्र मुख्याधिकाऱ्यांची कार्यशाळा आल्याने ते उपलब्ध होऊ शकले नाही. परिणामी १६ तारखेची मोहिम रखडली व १७ जानेवारीपासून मोहीम राबविणार असल्याचे मुख्याधिकारी मोरे यांनी सांगीतले. त्यानुसार १७ पासून कर वसुली अभियान राबविणे अपेक्षीत होते. मात्र मुख्याधिकारी उपलब्ध न होऊ शकल्याने हा दिवसही तसाच गेला व पुन्हा एकदा कर वसुली अभियान टाय-टाय फिस्स्स... झाल्याचे दिसून आले. (शहर प्रतिनिधी)