कर वसुलीचे काऊंटडाऊन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:54 AM2021-03-04T04:54:55+5:302021-03-04T04:54:55+5:30
गोंदिया : नगर परिषदेला यंदा चालू मागणी व मागील थकबाकी असे एकूण ११ कोटी ३ लाख रुपयांच्या मालमत्ता कर ...
गोंदिया : नगर परिषदेला यंदा चालू मागणी व मागील थकबाकी असे एकूण ११ कोटी ३ लाख रुपयांच्या मालमत्ता कर वसुलीचे टार्गेट होते. यातील ५ कोटी ५२ लाख ३८ हजार ४४४ रुपयांची कर वसुली नगर परिषदेने २८ फेब्रुवारीपर्यंत केली आहे. मात्र आता मालमत्ता कर वसुलीचा खरा काऊंटडाऊन सुरू झाला असून २८ दिवसात नगर परिषद कर विभागाला ५ कोटी ५० लाख रुपयांची वसुली करायची आहे.
नगर परिषद कर विभागाने यंदा कुणालाही न जुमानता कर वसुलीचा धडाका सुरू केला होता. यासाठी कर वसुली पथकाने सुमारे ९० ज्या जवळपास मालमत्तांना सील ठोकले होते. परिणामी धडाक्यात वसुली झाली व यातूनच २८ फेब्रुवारीपर्यंत ५ कोटी ५२ लाख ३८ हजार ४४४ रुपयांची कर वसुली झालेली आहे. म्हणजेच, टार्गेटच्या ५० टक्के कर वसुली पथकाने यंदा करून टाकली आहे. मात्र यंदा नगर परिषदेला चालू मागणी व मागील थकबाकी असे एकूण ११ कोटी ३ लाख रुपयांच्या कर वसुलीचे टार्गेट आहे. म्हणजेच, उरलेल्या २८ दिवसात आता कर विभागाला ५ कोटी ५० लाख रुपयांची कर वसुली करावयाची आहे.
मालमत्ता कर वसुलीचे अत्यंत डोकेदुखीचे काम यंदा कर वसुली विभागाने मोठ्या धडाक्यात सुरू केले. मुख्याधिकारी करण चव्हाण यांच्या आदेशामुळे कर वसुली पथकाने थेट कारवाईचे शस्त्र उपसल्याने यंदा मोठ्या प्रमाणात कर वसुली झाली आहे. आतापर्यंत झालेल्या मालमत्ता कर वसुलीत ८५ लाख ६१ हजार ७८७ रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती, नाईस ऑटो व बॅंक ऑफ इंडियाच्या समावेशनातून काढून घेण्यात कर विभागाला यश आले आहे. वसुली झालेल्या रकमेतील सुमारे ६७ टक्के वसुली मागील थकबाकीतील आहे तर ४५ टक्के वसुली चालू मागणीतील आहे.
---------------------
सुमारे ६२ लाखांचे प्रकरण न्यायालयात
शहरातील मालमत्ता कराची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामध्ये सुमारे ६२ लाख २८ हजार ३८१ रूपयांचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे एवढी रक्कम अडकून पडली आहे. परिणामी ही रक्कम वसुलीत आली असती तर नक्कीच यंदाची टक्केवारी आणखी वाढली असती. मात्र त्यानंतरही यंदाची मालमत्ता कर वसुली चांगलीच ठरली आहे.
----------------------
सन २०१६-१७ चा रेकॉर्ड तुटणार
नगर परिषदेने सन २०१६-१७ मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक ५१.५८ टक्के कर वसुली केली होती. त्याची ५ कोटी ८ लाख ५१ हजार ५८० एवढी रक्कम होती. यंदा नगर परिषदेने २८ फेब्रुवारी पर्यंत ५ कोटी ५२ लाख ३८ हजार ४४४ रूपयांची कर वसुली करून घेतली आहे. मात्र त्याची टक्केवारी ५० टक्के होत आहे. मात्र उरलेल्या २८ दिवसात कर विभाग सन २०१६-१७ हा रेकॉर्ड मोडणार आहे.