शिक्षक दिनविशेष; गोंदिया जिल्ह्यात शिक्षकाने बंद शाळेला दिली संजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 10:53 AM2018-09-05T10:53:50+5:302018-09-05T10:58:31+5:30
महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवर असलेले रेहळी हे अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त गाव. येथील विद्यार्थ्यांना सोडा पालकांनाही शिक्षणात रस नव्हता. बोलीभाषा ही छत्तीसगडी होती.
नरेश रहिले
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवर असलेले रेहळी हे अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त गाव. येथील विद्यार्थ्यांना सोडा पालकांनाही शिक्षणात रस नव्हता. बोलीभाषा ही छत्तीसगडी होती. शुध्द मराठीत बोलणे तर नाहीच पण झाडीबोलीचेही शब्द त्यांच्या तोंडातून येत नव्हते. एकेकाळी स्वातंत्रदिनी झेंडावंदनाला शाळेतील दोनच शिक्षक सोडले तर गावातील विद्यार्थी व पालकही उपस्थित रहात नव्हते. अश्या गावातील विद्यार्थ्यांना मराठीत बोलके करून शाळा सुरू करण्याचे काम येथील शिक्षक मंगलमूर्ती किशन सयाम यांनी केले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील ११४ गावे नक्षल कारवाईसाठी प्रसिद्ध असून महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवरील गावे ही नक्षलवाद्यांचे रेस्ट झोन म्हणून ओळखली जातात. देवरी तालुक्याच्या रेहळी या गावात शिक्षक मंगलमूर्ती सयाम ३ आॅगस्ट २०१२ मध्ये रूजू झाले. त्या गावात कुणालाही मराठीचा गंध नव्हता. वाचन करताना किंवा बोलताना विद्यार्थ्यांना अडचण जात होती. शाळेकडे अनेक मुलांची पाठ होती. मंगलमूर्ती यांनी पालकांशी दिवसरात्र संवाद साधणे सुरू केले. पालकांच्या घरी भेटी देऊन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्या गावातील लोकांच्या मुलांना शिक्षणाची गोडी कशी लागेल याचा अभ्यास करून त्यांनी लोकांशी सतत संवाद साधून आपलेसे केले. लोकांची मने जोडण्यासाठी रात्रकालीन स्रेहसंमेलन, प्रौढ कबड्डी स्पर्धा व अनेक लोकोपयोगी कार्यक्रम शाळेत घेतले. शाळेतून गुणवत्तापूर्ण शिक्षण इतरही विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी स्वत:ची दोन्ही मुलांची नावे त्यांनी या शाळेत दाखल करून त्यांच्यापासून प्रवेश वाढवा उपक्रमाला सुरूवात केली. शिक्षक सयाम यांच्या कार्याची चर्चा परिसरात गावात गेली. परिणामी त्यांच्या हातून उत्तम विद्यार्थी घडताहेत हे ऐकून परिसरातील केशोरी, वांढरा, डोंगरगाव व चिचगड या गावातील २९ विद्यार्थी त्यांच्या शाळेत दाखल झाले. ते रूजू झाले तेव्हा ७० पटसंख्या होती आता येथे ११५ विद्यार्थी आहेत. अवघड क्षेत्रात असलेल्या या शाळेचा आदर्श घेण्यासाठी जिल्ह्यातील ४० शाळांनी त्या शाळेला भेट दिली आहे. आजघडीला ही शाळा जिल्ह्यातील गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाºया शाळांपैकी एक शाळा म्हणून नावारुपास आली आहे.
आमच्या शाळेला सुट्टी नसते
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण २४ तास व सात दिवस तत्पर असले पाहिजे, या धारणेतील शिक्षक मंगलमूर्ती सयाम म्हणतात, आमच्या शाळेला सुट्टीच नसते. शाळेचा दिवस असो की सुट्टीचा दिवस असो दररोज आम्ही विद्यार्थ्यांसाठी शाळा भरवितो. सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ ही शाळेची वेळ निश्चित ठेवली आहे. सुट्टीच्या दिवशी अधिकचा वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना नवोदय, शिष्यवृत्ती, इतर स्पर्धांसाठी तयार करण्यात ते मश्गूल असतात. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयी आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातात.