शिक्षक जुंपले खड्डे खोदण्याच्या कामात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 10:31 PM2018-05-28T22:31:53+5:302018-05-28T22:32:01+5:30

पावसाळा तोंडावर आहे. शाळा सुरु व्हायला अजून एक महिना शिल्लक आहे. पण शासनाने शिक्षकांना कामाला जुंपले आहे. वृक्ष लागवड करण्यासाठी शाळा व परिसरात खड्डे खोदण्याचा फतवा शिक्षण विभागाने काढला आहे.

The teacher is excavating the pits | शिक्षक जुंपले खड्डे खोदण्याच्या कामात

शिक्षक जुंपले खड्डे खोदण्याच्या कामात

Next
ठळक मुद्देवृक्षलागवड : शिक्षण विभागाने काढला फतवा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पावसाळा तोंडावर आहे. शाळा सुरु व्हायला अजून एक महिना शिल्लक आहे. पण शासनाने शिक्षकांना कामाला जुंपले आहे. वृक्ष लागवड करण्यासाठी शाळा व परिसरात खड्डे खोदण्याचा फतवा शिक्षण विभागाने काढला आहे.
दरवर्षी १ ते ३१ जुलै या काळात वृक्ष लागवडीचा मोठा कार्यक्रम घेतला जातो. प्रचार अन प्रसार करण्यासाठी मोठ्या स्तरावर रुपये खर्च केले जातात. त्या खर्चाचे पध्दतशीर नियोजन केले जाते. पण शाळांना किंबहुना मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या कमाईतून पैसा वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी दरवर्षी खर्च होतो.
खड्डे खोदण्याचे निर्देश प्रशासनाने मुख्याध्यापकांना दिले आहेत. त्या निर्देशाचे पालन मुख्याध्यापक करीत आहेत.
शिक्षकच मजुरांकडून झाडे लागवड करण्यासाठी खड्डे खोदण्याचे काम करीत आहेत. अनेक शाळांमध्ये सदर काम सुरु आहे. खड्डे खोदण्याचा खर्च, त्यानंतर वृक्ष खरेदी व इतर कार्यक्रमांवर येणारा खर्च शिक्षक व मुख्याध्यापक उचलत आहेत. शासनाकडून एक दमडीही शाळांंना दिली जात नाही.
ज्या शाळा हरीत सेनेत समाविष्ट आहेत, अशा सर्व शाळांना दोन हजार पाचशे रुपये दिले जायचे. आता त्या निधीत एक हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे वृक्ष लागवड करण्याचा खर्च पेलला जाईल का? असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे.
शासनाने वृक्ष लागवडीसाठी शाळेत खड्डे खोदण्याकरिता अनुदान द्यावे किंवा रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मजुरांद्वारे खड्डे खोदण्याचे काम करण्यात यावे.
तसेच शाळांना वृक्ष लागवडीकरिता रोपे मोफत पुरविली जावी. त्या वृक्षांना संरक्षण देण्यासाठी खासगी व जिल्हा परिषद शाळांना ट्री गार्ड पुरविण्यासाठी खासदार, आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निधीतून साहित्य देण्यात यावे. झाडे लावा व जगवा असे सांगितले जाते. पण उन्हाळ्यात अनेक गावांत पाण्याची भीषण टंचाई आहे. अनेक शाळांत पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यासाठी जिल्हा परिषद शाळांसह खासगी शाळांत पाणी टंचाई भेडसावत आहे. तिथे हातपंप, बोअरवेल देण्याची योजना राबविण्यात यावी. अनेक शासनाच्या महत्वपूर्ण योजनेत खासगी व जिल्हा परिषद असे अंतर केले जाते.
विविध योजनेतील मिळणारी सापत्न वागणूक बंद केली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तथापि वृक्ष लावण्यासाठी भर उन्हात गुरुजी खड्डे खोदण्याच्या कामाला लागल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात सुरु आहे.

Web Title: The teacher is excavating the pits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.