‘त्या’ शिक्षकाने केली विद्यार्थिनींना अमानुषपणे मारहाण ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:21 AM2021-07-20T04:21:08+5:302021-07-20T04:21:08+5:30
सडक-अर्जुनी : तालुक्यातील मौजा परसोडी (सडक) येथील मुख्याध्यापक हिवराज नीताराम परशुरामकर यांनी वर्ग ४ थीत शिकणाऱ्या तीन विद्यार्थिनींना अमानुषपणे ...
सडक-अर्जुनी : तालुक्यातील मौजा परसोडी (सडक) येथील मुख्याध्यापक हिवराज नीताराम परशुरामकर यांनी वर्ग ४ थीत शिकणाऱ्या तीन विद्यार्थिनींना अमानुषपणे मारहाण केल्यामुळे त्यांना गोंदिया येथील दवाखान्यात रेफर करण्याची गरज पडली आहे. त्यामुळे पालकांनी शिक्षकाची मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार करून निलंबनाची मागणी केली आहे.
कोरोनाच्या प्रभावामुळे सध्यातरी शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना त्या गावच्या परिसरामध्ये एकत्र करून विद्यार्जनाचा उपक्रम सुरू आहे. परसोडी जिल्हा परिषद शाळेतील काही विद्यार्थ्यांना हनुमान मंदिरात, काहींना बौद्धविहारात तर काहींना घरी शिकविणे सुरू आहे. ९ जुलै रोजी मुख्याध्यापक हिवराज परशुरामकर यांनी सुद्धा शिवणकर यांच्या घरी ४ थीतील विद्यार्थ्यांची शाळा भरवली.
शुद्धलेखन बरोबर लिहिता येत नाही म्हणून त्यांनी मोनाली हेमराज कोरे, रिया गिरीधर हत्तीमारे व सोनाली दिलीप हेमने या विद्यार्थिनींना एवढे मारले की, २४ तास होऊन गेल्यावरही त्यांच्या पाठीवरचे मारल्याचे व्रण नाहीसे झाले नाहीत. रियाच्या डोक्याचे अगोदरच दोन ऑपरेशन झाले असून, तिच्याही डोक्याला जबर इजा झाली आहे. त्या विद्यार्थिनींना येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता, गोंदियाला रेफर करण्याची वेळ व सीटी स्कॅन करण्याची वेळ पालकांवर आली आहे.
विद्यार्थिनींना मारल्यानंतर आपल्या आई-वडिलांना आम्हाला मारले म्हणून सांगायचे नाही. सांगितल्यास तुमची उद्या चटणी करीन व टी.सी. घेऊन जातील, अशा प्रकारच्या धमक्याही देण्यात आल्या. मुलींनी झालेला सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यावर पालकांचा पारा चढला व पालकांनी परशुरामकर यांची डुग्गीपार पोलीस ठाण्यात तक्रार केली. ग्रामपंचायतीने या प्रकरणाची दखल घेऊन गाव आणि शाळेत मुख्याध्यापकाचे वागणे बरोबर नाही. कोणाचाही ते अपमान करतात, त्या मुख्याध्यापकावर कारवाई व्हावी, याकरिता कंबर कसली आहे.
कोट
मुख्याध्यापक परशुरामकर यांची वागणूक बरोबर नाही. त्यांची भाषा उद्धटपणाची आहे. अशा मुख्याध्यापकाला गावात ठेवणे योग्य नाही. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
यमू उमराव कुसराम, सरपंच
-------------------
मुख्याध्यापकाला त्वरित निलंबित करावे, अन्यथा शिक्षण विभागासमोर मोठे आंदोलन करावे लागेल.
खेमराज कोरे, उपसरपंच
--------------
झालेला प्रकार हा अत्यंत वाईट आहे. त्या मुख्याध्यापकाचे निलंबन या शाळेतून करावे, अशा शिक्षकास गावातील शाळेत येऊ देणार नाही, अन्यथा आंदोलन करू.
दिलीप हेमणे, गिरीधर हत्तीमारे, पालक