शिक्षक हा समर्पित भावनेचा असावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:35 AM2021-09-07T04:35:05+5:302021-09-07T04:35:05+5:30
- अनिल मंत्री : सरस्वती व जीएमबी विद्यालयात शिक्षक गौरव दिन साजरा अर्जुनी-मोरगाव : देशाची भावी पिढी घडविण्याचे काम ...
- अनिल मंत्री : सरस्वती व जीएमबी विद्यालयात शिक्षक गौरव दिन साजरा
अर्जुनी-मोरगाव : देशाची भावी पिढी घडविण्याचे काम शिक्षक करीत असतो. शिक्षक व डॉक्टर या दोन्ही व्यक्तीवर समाजाचा अतुट विश्वास असतो. पालक शिक्षकांवर विश्वास ठेवून पाल्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्याला शाळेत पाठवितात. समाजाचा एक आदर्श मार्गदर्शक म्हणून शिक्षकाकडे बघितले जाते. तो विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य आकार देतो म्हणूनच डॉक्टर राधाकृष्णन यांनी माझा जन्मदिन ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करावा, असे सांगितले. विद्यार्थ्यांची सर्वागीण प्रगती साधण्यासाठी शिक्षकाने नेहमी समर्पित भावना ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य अनिल मंत्री यांनी केले.
येथील सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच जीएमबी कनिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त वतीने आयोजित शिक्षक गौरव दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पाहुणे म्हणून जीएमबी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य वीणा नानोटी, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हरिदास गहाणे, शाळेच्या पर्यवेक्षिका छाया घाटे, मुकेश शेंडे, सरिता शुक्ला, संजय बंगळे, प्रा. यादव बुरडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते देवी सरस्वती व माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांच्या छायाचित्राचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. यानंतर पुष्पगुच्छ व शुभेच्छापत्र देऊन पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नानोटी यांनी, शिक्षकाचा आपल्यात कर्म, प्रवृत्ती व मनावर ठाम विश्वास असला पाहिजे, असे मत व्यक्त केले. यावेळी पर्यवेक्षक छाया घाटे, मुकेश शेंडे, शिक्षक संजय बंगळे, प्रा. यादव बुरडे, प्रा, जे .डी. पठाण, अर्चना गुरनुले, सूर्यकांत लुटे, धनश्री चाचेरे यांनी शिक्षक दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. संचालन करून आभार प्रा. इंद्रनील काशिवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी सुजित जक्कुलवार, महेश पालीवाल, विष्णू चाचेरे, पंकज मोरे व इतर शिक्षकांनी सहकार्य केले.