शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षक निलंबित
By admin | Published: June 30, 2016 01:59 AM2016-06-30T01:59:23+5:302016-06-30T01:59:23+5:30
सहायक शिक्षक एच.डी. चौधरी यांना पदावरून त्वरित हटवावे, सातवीनंतर आठवीचे वर्ग सुरू करावे
गोंदिया : सहायक शिक्षक एच.डी. चौधरी यांना पदावरून त्वरित हटवावे, सातवीनंतर आठवीचे वर्ग सुरू करावे व मागील तीन वर्षांपासून रिक्त असलेले मुख्याध्यापकाचे पद भरण्याची मागणी नंगपुरा मुर्री येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीने संबंधित विभागाकडे केली होती. मागणी पूर्ण न झाल्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी २७ जून रोजी व्यवस्थापन समितीने शाळेला कुलूप ठोकले. त्यामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थी शाळेत जावू शकले नाही.
या प्रकरणाची माहिती शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांना मिळाताच ते शाळेत पोहोचले व प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सहायक शिक्षक चौधरी यांना निलंबित केले. तसेच त्यांच्याद्वारे उर्वरित मागण्या लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आल्यावर कुलूप उघडून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांचे स्वागत त्यांना गणवेश व पाठ्यपुस्तके देवून करण्यात आले. आंदोलनकर्त्यांमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश रहांगडाले, सदस्य उर्मिला, खेमराज बावणकर, हासुलेखा हरिणखेडे, राजेंद्र मेश्राम, पुस्तकला मरस्कोल्हे, जि.प. सदस्य शैलजा सोनवाने, पं.स. सदस्य दिव्या चंद्रिकापुरे यांच्यासह पालक व ग्रामस्थ सहभागी होते. (प्रतिनिधी)
आठवा वर्ग सुरू करण्याची मागणी
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा नंगपुरा मुर्री येथे मागील तीन वर्षांपासून मुख्याध्यापकाचे पद रिक्त आहे. सहायक शिक्षक चौधरी अस्वस्थ राहत असल्यामुळे शैक्षणिक कार्य प्रभावित होत आहे. त्यातच या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्यामुळे सातव्या वर्गाचे विद्यार्थी उत्तीर्ण होवून अन्य खासगी शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येतात. हा प्रकार थांबविण्यासाठी याच शाळेत आठवा वर्ग सुरू करण्याची मागणी मागील अनेक महिन्यांपासून शिक्षण विभागाकडे केली जात आहे. परंतु कसलाही परिणाम झाला नाही.