शिक्षक दारोदारी जाऊन गिरविणार आता गृहमालेचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 05:00 AM2020-07-05T05:00:00+5:302020-07-05T05:00:25+5:30
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक उपाययोजना म्हणून राज्यातील शैक्षणिक संस्था मागील चार महिन्यांपासून बंद आहेत. असे असले तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शासनाच्यावतीने शाळा बंद पण शिक्षण सुरू हे ब्रीद साध्य करीत विविध माध्यमातून ऑनलाईन शिक्षण देणे सुरू आहे. त्यात टीव्ही, युट्युब चॅनल्सच्या माध्यमातून शिक्षण देणे सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया : कोरोना संक्रमणाच्या कालावधीत शाळा बंद पण शिक्षण सुरू हे ब्रीद सिद्ध करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे ऑफलाईन शिक्षण देणारा ‘गृहमाला’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमातंर्गत शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारोदारी जाऊन आता शिक्षणाचे धडे गिरविणार आहेत.
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक उपाययोजना म्हणून राज्यातील शैक्षणिक संस्था मागील चार महिन्यांपासून बंद आहेत. असे असले तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शासनाच्यावतीने शाळा बंद पण शिक्षण सुरू हे ब्रीद साध्य करीत विविध माध्यमातून ऑनलाईन शिक्षण देणे सुरू आहे. त्यात टीव्ही, युट्युब चॅनल्सच्या माध्यमातून शिक्षण देणे सुरू आहे.
आकाशवाणीद्वारे दर मंगळवार आणि शुक्रवारला सकाळी १०.३० वाजता रेडिओवरून शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित करण्यात येत आहेत. परंतु या पद्धतीच्या ऑनलाइन शिक्षणाला ग्रामीण भागात अनेक मर्यादा येत आहेत म्हणून शिक्षण विभाग गोंदियाच्यावतीने शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांच्या कल्पकतेतून ऑनलाईन शिक्षणातील उणिवा दूर सारून ऑफलाईन शिक्षण देणारा गृहमाला उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या उपक्रमानुसार २६ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले असले तरी कोरोना प्रकोपामुळे विद्यार्थी शाळेत येण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे शिक्षकांनी दारोदारी जाऊन इयत्ता दुसरी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचे आहे. यामध्ये भाषा, गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास व विज्ञान याविषयांचे गृहकार्य द्यायचे आहे.
हे करताना वर्ग, स्तरनिहाय विद्यार्थी गट तयार करून त्यांना शिक्षण द्यायचे असून याकरिता भाषा, गणित, इंग्रजी पेटीतील साहित्यांचा सुद्धा वापर करण्याचे निर्देश दिले आहे.
तसेच दररोज केलेल्या कार्यवाहीची माहिती शिक्षकांना सायंकाळी पाच वाजतापूर्वी गुगल लिंकवर भरायची आहे. या उपक्रमावर मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख याचे नियंत्रण राहणार असून जिल्हास्तरावर ४० तंत्रस्नेही शिक्षकांचा कोअर ग्रुप शिक्षकांच्या अडचणी सोडवून मार्गदर्शन करणार आहे.
३० जून रोजी ८० लोकांची ऑफलाईन सभा?
कोरोना विषाणू प्रतिबंध काळात प्रत्यक्ष सभा, संमेलने, कार्यक्र म करणे वा गर्दी जमा करण्यास मनाई असताना ३० जून रोजी शिक्षणाधिकारी कार्यालय गोंदिया येथे प्रत्येक तालुक्यातून पाच याप्रमाणे ४० शिक्षक व ४० केंद्रप्रमुख यांची प्रत्यक्ष सभा (आॅफलाईन) घेण्यात आल्याची माहिती आहे. सर्वत्र गर्दी करण्यास मनाई असताना याप्रकारे झालेल्या सभेबाबद सर्वत्र चर्चा असून आपत्ती व्यवस्थापन अधिकारी याबाबद काय भूमिका घेताय याकडे लक्ष लागले आहे.
शिक्षक शिक्षणदूत होणार की कोरोनादूत?
कोरोना विषाणू प्रतिबंध काळात रेल्वे, बस, कारखाने, उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था, महाविद्यालये यासारख्या बहुतांश यंत्रणा बंद पडलेल्या असताना प्राथमिक शिक्षणाचा उदोउदो करून गृहमालासारखे उपक्रम सुरू करणे म्हणजे नाहक शिक्षणाचा आव आणण्याचा प्रकार असल्याचे बोलल्या जाते. दरम्यान दारोदारी साहित्य पेटी घेऊन शिक्षण देण्यासासाठी जाणाºया शिक्षकांना सुजाण पालक घरात प्रवेश देतील काय याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे. ठाणे जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात पाठयपुस्तके वाटप करणाऱ्या शिक्षकांमुळे आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याची घटना ताजची आहे. दारोदारी फिरणाऱ्या शिक्षकांमुळे कोरोना विषाणूची लागण व संसर्ग विद्यार्थी,शिक्षक व पालकांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिक्षण देण्यासाठी दारोदारी फिरणारे शिक्षक हे शिक्षणदूत ठरणार की कोरोनादूत? असा सवाल उपस्थित केला जात आहे.