शिक्षकाची विद्यार्थ्यांना बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 08:23 PM2018-02-08T20:23:39+5:302018-02-08T20:24:31+5:30
विद्यार्थ्यांना दिलेले होमवर्क पूर्ण केले नाही म्हणून एका शिक्षकाने सातव्या वर्गाच्या सहा ते सात विद्यार्थ्यांना बेल्ट आणि रुळाने बेदम मारहाण केली. हा प्रकार बुधवारी (दि.७) दुपारच्या सुमारास सडक-अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ केंद्रीय प्राथमिक शाळेत घडला.
ऑनलाईन लोकमत
पांढरी : विद्यार्थ्यांना दिलेले होमवर्क पूर्ण केले नाही म्हणून एका शिक्षकाने सातव्या वर्गाच्या सहा ते सात विद्यार्थ्यांना बेल्ट आणि रुळाने बेदम मारहाण केली. हा प्रकार बुधवारी (दि.७) दुपारच्या सुमारास सडक-अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ केंद्रीय प्राथमिक शाळेत घडला. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी याची माहिती पालकांना दिली. पालकांना ही माहिती कळताच शिक्षकाविरुद्ध संताप व्यक्त करीत याची तक्रार डुग्गीपार पोलीस स्टेशनला केली.
डी.वाय.कटरे असे विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या पदवीधर शिक्षकाचे नाव आहे. बुधवारी (दि.७) कटरे यांनी इयत्ता सातव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना घरुन होमवर्क पूर्ण करुन आणला का? अशी विचारणा केली. तेव्हा प्रशांत हंसराज उके (१२), वैशाली राजकुमार पटले (१३), विवेक रामेश्वर चिंधालोरे (१२), नितीन रामदयाल कोसरे (१२), भाग्यश्री मधू कोरे (१३), हर्षल कोटांगले, जियानी आनंद तोंडफोडे (१३) या विद्यार्थ्यांनी होमवर्क पूर्ण न केल्याचे सांगितले. यावरुन शिक्षक कटरे यांनी या विद्यार्थ्यांना बेल्ट आणि रुळाने बेदम मारहाण केली. यात कुणाला पाठीवर तर कुणाला हाता, पायावर, पोटावर मारले.
बेल्ट व रुळाने मारहाण केल्याच्या जखमा सुध्दा विद्यार्थ्यांच्या शरीरावर उमटल्या आहे. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी घरी जाऊन हा सर्व प्रकार पालकांना सांगितला. यामुळे गावातील वातावरण तापले होते. दरम्यान प्रशांत उके (वर्ग ७ वा) या विद्यार्थ्यांने त्याच्या पालकासह डुग्गीपार पोलीस स्टेशन गाठून बुधवारी (दि.७) सायंकाळी मारहाण करणाऱ्या शिक्षकाविरुध्द तक्रार दाखल केली. गुरूवारी (दि.८) सकाळपासून विद्यार्थ्यांचे पालक व गावकºयांनी शाळेत पोहचून याचा जाब विचारला. प्राप्त माहितीनुसार मुख्याध्यापक जी.के. चौधरी हे शाळा सिद्धी प्रशिक्षणासाठी बाहेरगावी गेले आहे.
त्यामुळे त्यांचा तात्पुरता प्रभार पदवीधर शिक्षक डी.आय.कटरे यांच्याकडे सोपविला होता. कटरे इयत्ता सातवीला इंग्रजी व मराठीचे शिकवितात. गुरूवारी (दि.८) त्या शिक्षकाला याचा जाब विचारण्यासाठी पालक शाळेत गेले असता सदर शिक्षक रजेवर गेल्याची माहिती मिळाली. दरम्यान पोलिसांनी तक्रारीची दखल घेत ठाणेदार किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार साईनाथ नाकाडे, पोलीस हवालदार हरिचंद शेंडे, नाईक शिपाई विजय वड्डेटीवार यांनी गुरूवारी शाळेत पोहचत या प्रकरणाची चौकशी सुरू केली. तसेच काही विद्यार्थ्यांचे बयान नोंदविले.
सभापती व बिडीओची भेट
मारहाण झालेल्या विद्यार्थ्यानी पोलीस व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याना बयान देताना सदर शिक्षक व्यसनी असून यापूर्वी देखील मारहाण केल्याचे सांगितले. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत सडक-अर्जुनी पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी आनंद लोकरे व प.सं.सभापती जी.एम. हत्तीमारे यांनी गुरूवारी (दि.८) शाळेला भेट देऊन या संर्पूण प्रकरणाची माहिती घेतली. तसेच दोषी शिक्षकावर कारवाई करण्याचे आश्वासन पालकांना दिले.
त्वरित कारवाई करा अन्यथा आंदोलन
विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या शिक्षकावर शिक्षण विभागाने त्वरीत निलंबनाची कारवाई करावी. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भोजू पटले, विरेंद्र मेश्राम, श्रीधर तुरकर, आनंदराव तोंडफोडे, गुड्डू डागा, हेमराज उके, वर्षा उंदिरवाडे, राजकुमार पटले, भोजू खंडेलकर व पालकांनी दिला आहे.