सालेकसा तालुक्यात शिक्षकांची पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 11:49 PM2018-08-08T23:49:58+5:302018-08-08T23:50:33+5:30
राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासी, नक्षलग्रस्त तालुका म्हणून सालेकसा तालुक्याची ओळख आहे. तालुक्याच्या विकासासह शिक्षकांच्या रिक्त असलेल्या पदांमुळे शिक्षण विभागाला सुद्धा ग्रहण लागल्याचे चित्र आहे.
सागर काटेखाये ।
लोकमत न्यूज नेटवर्क
साखरीटोला : राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासी, नक्षलग्रस्त तालुका म्हणून सालेकसा तालुक्याची ओळख आहे. तालुक्याच्या विकासासह शिक्षकांच्या रिक्त असलेल्या पदांमुळे शिक्षण विभागाला सुद्धा ग्रहण लागल्याचे चित्र आहे.
यावर्षी जून महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या करण्यात आल्या. अनेक शिक्षकांनी आपल्या सोयीनुसार गावांची नावे आॅनलाईन अर्जामध्ये भरली होती. त्यानुसार शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. यात सालेकसा तालुक्यातून अनेक शिक्षक बदलून गेले. मात्र आदिवासी, नक्षलग्रस्त क्षेत्रात बरेच शिक्षक बदली झालेल्या ठिकाणी जाण्यास बरेच शिक्षक इच्छुक नाहीत.
परिणामी बऱ्याच जि.प.प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. तालुक्यात जि.प.हायस्कूलची संख्या दोन तर १११ प्राथमिक शाळा आहेत. पद मान्यतेनुसार उच्च श्रेणी मुख्याध्यापक १३ असून एक पद रिक्त आहे. पं.स. सालेकसा अंतर्गत जि.प.शाळा बोदलबोडी येथे मुख्याध्यापकाचे पद रिक्त आहे.
पदवीधर शिक्षकांची संख्या १०४ आहे. मात्र प्रत्यक्षात केवळ ८५ शिक्षक कार्यरत आहेत. २६५ सहाय्यक शिक्षकांचे पद मान्य असताना केवळ २६१ शिक्षक कार्यरत आहेत. जि.प.शाळांकरीता असूनही ४१ शिक्षकांची पदे त्वरीत भरण्याची गरज आहे.
शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्याच्या ज्ञानार्जनात अडचणी येत आहेत. दुर्गम भागातील शाळांमध्ये वर्ग ४ मात्र शिक्षक एक किंवा २ अशी अवस्था आहे. त्यामुळे जि.प.च्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी होत आहे.
शासनाद्वारे प्राथमिक शाळांची गुणवत्ता वाढविण्याकरीता गुणवत्ता विकास कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविला जातो. परंतु शिक्षकांच्या कमतरतेमुळे गुणवत्ता विकास कसा होईल? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकदा प्रकृतीमध्ये किंवा इतर कारणामुळे शिक्षक सुट्टीवर असतात. अशावेळी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खेळखंडोबा निर्माण होते.
यामुळेच जि.प.शाळांमध्ये आपल्या पाल्यांना शिकविण्याचा पाल्यांचा कल कमी होत असल्याचे चित्र आहे. शासनाद्वारे शिक्षणावर कोट्यवधी रुपये खर्च करुनही कर्मचाºयांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्याची गुणवत्ता खालावलेली आहे.
तालुक्यात शिक्षकांची ४३ पदे रिक्त आहेत. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये, याची काळजी घेतली जाते. कार्यरत शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम केले जात आहे.
- एस.जी.वाघमारे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी.