भावी पिढी तंबाखूमुक्त करण्याची जबाबदारी शिक्षकांची ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:53 AM2021-02-18T04:53:27+5:302021-02-18T04:53:27+5:30
गोरेगाव : आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत बहुतांशजणांना तंबाखूचे व्यसन जडले आहे. विद्यार्थीही तंबाखूचे सेवन करीत असून, तंबाखूमुळे भावी पिढी बरबाद ...
गोरेगाव : आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत बहुतांशजणांना तंबाखूचे व्यसन जडले आहे. विद्यार्थीही तंबाखूचे सेवन करीत असून, तंबाखूमुळे भावी पिढी बरबाद होत आहे. त्यांना वेळीच यापासून दूर ठेवण्याची गरज आहे. भावी पिढी तंबाखूमुक्त करण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी एन. जे. सिरसाट यांनी केले.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, सलाम मुंबई फाऊंडेशन व आरोग्य प्रबोधिनी यांच्या संयुक्तविद्यमाने गटसाधन केंद्रात तंबाखूमुक्त शाळा अभियानअंतर्गत आयोजित कार्यशाळेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून सलाम मुंबईचे संदेश देवरुखकर, आरोग्य प्रबोधिनीचे डॉ. सूर्यप्रकाश गभने, कार्यक्रम अधिकारी दिलीप बघेले, विस्तार अधिकारी शशिकांत खोब्रागडे उपस्थित होते. जिल्ह्याने तंबाखूमुक्त शाळा अभियानात उत्कृष्ट कामगिरी करून जिल्ह्यातील १६५३ शाळांपैकी १५८५ शाळांनी तंबाखूमुक्त शाळेचे निकष अपलोड करून तंबाखूमुक्त शाळा घोषित केलेल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालय व महाराष्ट्र राज्य आरोग्य शिक्षण व आरोग्य विभागाने तंबाखूमुक्त शाळांचे सुधारित ९ निकष पारित केले. यात जिल्ह्यातील उर्वरित ९२ शाळांनी तंबाखूमुक्त शाळेचे निकष पूर्ण केले नव्हते. या शाळांचे निकष पूर्ण करण्याकरिता नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार गोरेगाव, गोंदिया व तिरोडा तालुक्यातील निकष पूर्ण न केलेल्या शाळांच्या मार्गदर्शनाकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेत देवरुखकर यांनी, नवीन निकषांची ओळख, मांडणी व अपलोड करण्याच्या पद्धती यावर सविस्तर सादरीकरण केले. डॉ. गभने यांनी, अपलोड करताना येणाऱ्या अडचणींची चर्चा व त्यावरील उपाययोजनांची मांडणी केली. आरती पुराम यांनी सर्वांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली. संचालन विषय साधन व्यक्ती सुनील ठाकूर यांनी केले. कार्यशाळेला गोरेगाव, गोंदिया व तिरोडा तालुक्यातील निकष पूर्ण न केलेल्या शाळांचे मुख्याध्यापक, निवडक केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती उपस्थित होते. कार्यशाळेसाठी गट साधन केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.