शिक्षकांच्या पदस्पर्शाने सोनी शाळा झाली आदर्श
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:54 AM2019-01-31T00:54:21+5:302019-01-31T00:55:03+5:30
शिक्षक हा समाज प्रबोधनाचा पाईक असतो, हे कुठेतरी ऐकले होते. तर आई मुलाला सृष्टी देत असली तरी दृष्टी देण्याचे काम शिक्षक करतो. याचे वास्तविक दर्शन तालुक्यातील सोनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे गेल्यावर होते दिसते.
दिलीप चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : शिक्षक हा समाज प्रबोधनाचा पाईक असतो, हे कुठेतरी ऐकले होते. तर आई मुलाला सृष्टी देत असली तरी दृष्टी देण्याचे काम शिक्षक करतो. याचे वास्तविक दर्शन तालुक्यातील सोनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे गेल्यावर होते दिसते. दुर्लक्षित असलेल्या शाळेला नाविण्यपूृर्ण उपक्रमांनी नावारुपास आणून चेहरामोहरा बदलवून टाकला. शाळेचा चेहराच नाही तर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्मित आणण्याचे काम येथील शिक्षकांनी केले. त्यामुळे शिक्षकांच्या पदस्पर्शाने सोनी शाळा झाली आदर्श झाल्याचे सुखद चित्र आहे.
गोरेगाव येथून सात कि.मी.अंतरावर असलेल्या सोनी येथे जि.प.प्राथमिक शाळा असून पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. या शाळेत सध्या स्थितीत ८८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ५ जून २०१८ हा दिवस या शाळेसाठी महत्त्वपूर्ण ठरला. या शाळेला प्रसिद्ध हस्ताक्षर तज्ज्ञ म्हणून शिक्षक संजय वैद्य व मुख्याध्यापक म्हणून घनशाम कावळे हे दोन शिक्षक लाभले. हे दोन्ही शिक्षक सोनी शाळेत रुजू झाल्यावर त्यांनी इतर शिक्षकांना हाताशी घेत या शाळेचा चेहरामोहरा बदलविण्याचे संकल्प केला. तब्बल एक लाख रुपये स्वत: जवळचे खर्च करुन शालेय परिसरात वर्गखोल्यात विकास कामांना सुरुवात केली. आवार भिंतीवर रंगरंगोटी, वृक्षारोपण, कुंड्याची रंगरंगोटी, शैक्षणिक दृष्टिकोनातून वर्गखोल्यांमध्ये रंगरंगोटी करुन आल्हाददायक वातावरण तयार केले. विद्यार्थ्यांमधील गणित विषयाची भिती काढण्यासाठी बेरीज, वजाबाकीचे सोपे सूत्र वर्ग खोलीच्या भिंतीवर तयार केले. त्यामुळे शाळेचे विद्यार्थी गणितात तरबेज होत आहे. जिल्हा परिषदेची शाळा म्हटले की कायमचे दुखणे, कुठे शिक्षक नाही तर कुठे शैक्षणिक वातावरणाचा अभाव त्यामुळे पालकही आपल्या पालकांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून खासगी शाळेत पाठवितात. त्यामुळे अनेकांचा जिल्हा परिषदेच्या शाळांकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. मात्र सोनी येथील जिल्हा परिषदेची शाळा या सर्व गोष्टींना अपवाद ठरली आहे. अलीकडे शासनाने प्रसिध्द केलेल्या शैक्षणिक अहवालात जि.प.च्या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावित असून विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याचे सांगितले. येथील विद्यार्थी मागील सहा महिन्यांपासून सुटाबुटात जात आहे. त्यांची अक्षरे पाहिल्यावर संगणकाने तर लिहिले नसावे असे वाटते. येथील प्राचार्य घनशाम कावळे, शिक्षक संजय वैद्य, शिक्षिका बी.एन.लहाने, रेखा साखरे या चार शिक्षकांनी स्वखर्चातून या शाळेचा चेहरामोहराच बदलवून टाकला. या सर्व कार्यासाठी विषयतज्ज्ञ सतिश बावणकर, सरपंच उषा वलथरे, उपसरपंच अशोक पटले, ग्रामसेविका एम.जी.आगाशे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष झनकलाल चव्हाण, उपाध्यक्ष चेतना पटले यांनी वेळोवेळी सहकार्य केले. विषेश म्हणजे येथील शिक्षिका रेखा साखरे या प्रतिनियुक्तीवर असताना सुद्धा त्यांनी स्वत:जवळचे १५ हजार रुपये देऊन शाळेच्या विकासाला हातभार लावला.
सोनीचे शिक्षक करणार गणिताची भीती दूर
गणित विषय म्हटला की विद्यार्थ्यांना भीती वाटते, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करतात. मात्र कठीण विषयाची अधिक भीती बाळगून त्याकडे दुर्लक्ष केले की, तो विषय पुन्हा कठीण होतो. तर मनोरंजनातून दिलेल्या शिक्षणाचा विद्यार्थ्यांवर त्वरीत परिणाम होत असतो. येथील शिक्षकांनी नेमकी हीच बाब हेरुन विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची भीती दूर करण्यासाठी चेंडू आणि सोप्या सूत्रांचा वापर केला. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थी गणितात तरबेज झाली. हा प्रयोग जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या इतरही शाळेत राबविण्याचा मानस सतीश बावणकर यांनी लोकमत प्रतिनिधीजवळ व्यक्त केला.
गांधीजीचे चार बंदर
राष्ट्रपिता महात्मा गांधीचे तीन बंदर एकले होते. पण या शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ गेल्यावर चार बंदर दृष्टीस पडतात. बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत बोले, मोबाईल का गलत उपयोग ना करो, जणू काही हा मूलमंत्र या शाळेने नेहमीसाठी स्वीकारला असावा. गांधीजीचे हे चार बंदर या शाळेतील मुलांना स्वभाव दर्शवितात आणि शिक्षकांनी शालेय कामात स्वत:ला झोकून दिल्याचा खरा आनंद देतात.
चेंडुच्या मदतीने बेरीज-वजाबाकी
पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्या बेरीज, वजाबाकी सोपी जावी, त्यांना लवकर समजावी म्हणून येथील शिक्षक संजय वैद्य यांनी एक शक्कल लढविली. विद्यार्थ्यांच्या दर्शनी भागात फळ्याजवळ एका दोरीत चेंडू लटकविले, त्या चेंडूच्या माध्यमातून बेरीज, वजाबाकी कशी करायची याचे तंत्र शिकविले. लोकमत प्रतिनिधीने जिल्हा परिषद शाळेला भेट दिल्यावर सर्वच मुले गणित विषयात तरबेज असल्याचे आढळले. सर्वांनी फटाफट बेरीज वजाबाकी करुन दाखविली.