जि.प.शाळांना शिक्षकांची दांडी
By admin | Published: August 5, 2016 01:33 AM2016-08-05T01:33:54+5:302016-08-05T01:33:54+5:30
अर्जुनी-मोरगाव तालुक्यात प्राथमिक शाळेच्या शिक्षणाचे किती हाल सुरू आहेत हे पंचायत समिती सभापतींच्या अचानक दिलेल्या शाळाभेटीत उघड झाले.
इसापूर : अर्जुनी-मोरगाव तालुक्यात प्राथमिक शाळेच्या शिक्षणाचे किती हाल सुरू आहेत हे पंचायत समिती सभापतींच्या अचानक दिलेल्या शाळाभेटीत उघड झाले. भरनोलीच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सुटी देऊन दोन शिक्षक सुटीची कोणतीही सूचना न देता गायब असल्याचे विदारक चित्र सभापती अरविंद शिवणकर यांनी अनुभवले.
खुद्द शिक्षकांनीच प्राथमिक शिक्षणाचा खेळखंडोबा मांडल्याचा हा प्रकार पाहिल्यानंतर शिवणकर यांनी या प्रकाराचा पंचनामा करून दोषी शिक्षकांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव जि.प. प्रशासनाकडे पाठविला. ज्या विद्यार्थ्यांच्या भरवशावर आपला उदरनिर्वाह चालतो, त्या विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याऐवजी त्यांना वाऱ्यावर सोडण्याच्या या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
सभापती शिवणकर यांनी गुरूवार २८ जुलैला ४.१५ वाजता भरनोलीच्या जि.प.प्राथमिक शाळेला भेट दिली. यावेळी तेथील शाळा बंद आढळली. त्यांनी नागरिकांकडे चौकशी केली असता शाळा सकाळपासूनच बंद असल्याचे सभापतींना सांगितले. या प्रकाराचा सभापतीनी पंचनामा केला. त्याचप्रमाणे राजोली येथील जि.प.प्राथमिक शाळेला सभापतींनी ४.५० च्या दरम्यान भेट दिली असता सहायक शिक्षक रविंद्र दाणी व जी.डी.वंजारी हेसुद्धा अनुपस्थित आढळले. मुख्याध्यापक आर.एम.गहाणे हे सभापतींना ३.४५ वाजता परसटोला ते अररतोंडी मार्गावर फिरताना आढळले. शाळा सुरू असताना मुख्याध्यापक व दोन सहायक शिक्षक हलचल रजिस्टरवर व कसलीही नोंद न करता निघून गेले होते. (वार्ताहर)