विद्यार्थ्यांना प्रेरणेसाठी शिक्षकांनी अपडेट राहावे
By admin | Published: January 4, 2017 12:53 AM2017-01-04T00:53:35+5:302017-01-04T00:53:35+5:30
आजचे युग विज्ञान व तंत्रज्ञानाचे आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी जे-जे गुण आहेत ते शिक्षकांनी ओळखले पाहिजे.
विलास खुणे : नवोदय हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिकोत्सव
केशोरी : आजचे युग विज्ञान व तंत्रज्ञानाचे आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी जे-जे गुण आहेत ते शिक्षकांनी ओळखले पाहिजे. त्यासाठी त्यांना प्रेरणा व मार्गदर्शनाची गरज आहे. चांगले सुसंस्कारीत विद्यार्थी खेड्यापाड्यातूनच घडतात. याची जाणीव शिक्षकांनी ठेवावी. सर्वगुणसंपन्न विद्यार्थी निर्माण करण्याचे कौशल्य फक्त शिक्षकांमध्येच आहे, हे विसरू नये. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी शिक्षकांनी अपडेट राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिवाजी महाविद्यालय गडचिरोली येथी प्रा.डॉ. विलास खुणे यांनी केले.
नवोदय हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिकोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी विद्यार्थी व शिक्षकांना ते मार्गदर्शन करीत होते.
उद्घाटन पं.स. सभापती अरविंद शिवणकर यांच्या हस्ते, संस्थाध्यक्ष माजी आ. दादासाहेब शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ. विलास खुणे व अतिथी म्हणून अन्न व औषध विभागाची उपायुक्त दादाजी पाटील गहाणे, जि.प. सदस्य तेजुकला गहाणे, प्रकाश पाटील गहाणे, विजय पाटील गहाणे, अशोक धिरण, रामदास पडोळे, चरण चेटुले, सुभाष चवडे, पं.स. सदस्य अर्चना राऊत, उपसरपंच हिरालाल पाटील शेंडे, सहायक खंडविकास अधिकारी अडेलवार, गटशिक्षणाधिकारी भेंडारकर, केंद्रप्रमुख शेंडे, बाला मोहतुरे, डॉ. नरहरी नागलवाडे, मनोहर ढोमणे, दिलीप गायधनी, गजानन कोवे, सुधाकर गजापुरे, जगदिश पाटील लांजेवार, यु.जे. जनबंधू उपस्थित होते.
संगीत लेझीम आणि बॅडपथकाच्या संचालनाद्वारे शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर पाहुण्यांचे आगमन होताच पाच सुवासिनींच्या हस्ते आरतीने ओवाळणी घालून कुमकुम तिलक व बॅचेस लावून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी टाळण्यांचा गजरात पाहुण्यांचे उभे राहून स्वागत केले. त्यानंतर पाहुण्यांचे हस्ते आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले.
प्रास्ताविकातून प्राचार्य अशोक हलमारे यांनी शाळेच्या प्रगती पथाचा व उत्तरोत्तर वाटचालीचा आढावा घेऊन अहवाल वाचन व आपल्या मनोगतातून पाहुण्यांचे परिचय करून दिले. संस्थाध्यक्ष दादासाहेब शेंडे यांनी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केल्याने त्यांच्या पुढील दीर्घायुष्यांसाठी शुभेच्छा देऊन त्यांचा सपत्नीक शाल व श्रीफळ देऊन अरविंद शिवणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दहावी व बारावीमध्ये प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांचा पाहुण्यांचे हस्ते स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिक देवून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी विज्ञान प्रदर्शन, कला प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन, पाककला प्रदर्शन, हस्तकला, पुष्पकला प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय सांस्कृतिक संध्या कार्यक्रमही घेण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना सादर करण्याची संधी लाभली.
बक्षीस वितरण अॅड. भरत हलमारे साकोली यांच्या अध्यक्षतेखाली, सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी शहाजी संग्रामे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य यशवंत परशुरामकर, प्राचार्य अशोक हलमारे, संतोष बुकावण, महादेव लोथे, उत्तम जनबंधू, प्राचार्य जयश्री नंदेश्वर, शिवसेना तालुका उपप्रमुख चेतन दहीकर, विलास बोरकर, तंमुस अध्यक्ष विलास राऊत प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविक नरेंद्र काडगाये, संचालन मनोहर पाऊलझगडे, रजनी झोडे तर आभार प्रा. रवी शिंगणजुडे व प्रा. प्रकाश बोरकर यांनी मानले.
विद्यार्थी, शिक्षक, पालक व संस्था यांची सांगड गरजेची
विद्यार्थी सुसंस्कारीत होण्यासाठी, शाळेचे नावलौकीक होण्यासाठी विद्यार्थी-पालक-शिक्षक आणि संस्था यांच्या विचारांची सांगड असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी पालकांची भूमिका फार महत्वाची आहे. या भागातील पालक जागृत असल्याची प्रचिती मला अनेकदा मिळाल्याची स्पष्टोक्ती आपल्या अध्यक्षीय भाषणामधून संस्थाध्यक्ष माजी आ. दादासाहेब शेंडे यांनी दिली.