विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची भटकंती सुरूच

By admin | Published: July 8, 2015 01:40 AM2015-07-08T01:40:49+5:302015-07-08T01:40:49+5:30

तालुक्यात अनेक ठिकाणच्या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया अजूनही पूर्ण व्हायची आहे. विद्यार्थ्यांच्या शोधात शिक्षक वर्गांची ...

Teachers strode for students | विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची भटकंती सुरूच

विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची भटकंती सुरूच

Next

पालकांना धमक्या व प्रलोभने : परवानगीशिवाय दिल्या जातात टी.सी.
डी.आर. गिरीपुंजे तिरोडा
तालुक्यात अनेक ठिकाणच्या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया अजूनही पूर्ण व्हायची आहे. विद्यार्थ्यांच्या शोधात शिक्षक वर्गांची भटकंती सुरू असून आपल्या तुकड्या वाचविण्याच्या नादात पालकांना धमक्या व प्रलोभने दिल्या जात आहेत. काही ठिकाणी परस्पर टी.सी.च काढून नेली जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांसोबत संगनमत करून, मुख्याध्यापकास विविध प्रलोभने देवून परस्पर टी.सी. नेण्याचा प्रकारही घडत असल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
टीसी (ट्रान्सफर सर्टीफिकेट) ही विद्यार्थी किंवा पालकांच्या हाती त्यांची स्वाक्षरी घेऊनच दिली जावी, असा नियम आहे. मात्र तालुक्यातील काही शाळेत असे न करता परस्पर दुसऱ्या शाळेतील शिक्षकांना, शाळांना विद्यार्थ्यांच्या टीसी दिल्या जातात. याबाबत पालकांना सुध्दा विश्वासात घेतल्या जात नाही. शिक्षण विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळेच काही शाळेत हा भोंगळ कारभार सर्रास सुरू आहे.
शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात अशा प्रकारचा तुच्छ प्रकार काही ठिकाणी सर्रास चालत आहे. कित्येक ठिकाणी पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरी न घेताच परस्पर टी.सी.दिल्या जात आहेत. टी.सी. वितरण रजिस्टर, दाखल खारीज रजिस्टर, शिक्षणाधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांनी स्वत: तपासावेत व स्वाक्षरी न घेता टी.सी. वितरित करणाऱ्या मुख्याध्यापकांवर कार्यवाही करावी, अशी पालकांची मागणी आहे.
साम, दाम, दंड, भेदचा वापर
काही शाळेतील मुख्याध्यापक शाळा सुधार निधीच्या नावाखाली प्रती टी.सी. २०० ते ५०० रु. घेताना दिसून येतात. हे पैसे सुध्दा टी.सी. संबंधित पालक देत नसून दुसऱ्या शाळेतील शिक्षकच देतात. एक शिक्षक दुसऱ्या शिक्षकांस निधीच्या नावावर लुबाडायला लागल्याचे दिसून येत आहे. वास्तविक टी.सी.चे पैसे नियमानुसार घेता येत नाही. त्यात पर्याय शोधून शाळा सुधार निधीच्या नावावर लुबाडणूक चालली आहे. हेच पैसे पालक देणार असते तर इतके घेतलेच नसते व पालकांनी सुध्दा दिले नसते.
विद्यार्थी आपल्याच शाळेत शिकावा त्यासाठी ड्रेस, पुस्तक, नोटबुक आणि प्रसंगी पैशाचेही आमिष दाखविल्या जात आहेत. एवढ्यावरच न थांबता दहावी, बारावीचे परीक्षा केंद्र असणारे काही मुख्याध्यापक व शिक्षक पालकांना, विद्यार्थ्यांना आमच्या शाळेत न पाठविल्यास परीक्षेत तुमच्या पाल्यांना रस्ट्रीकेट करू अशाही धमक्या देताना आढळून आलेत. साम, दाम, दंड, भेद या तंत्राचा वापर होताना दिसून येतो.

Web Title: Teachers strode for students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.