सभापतींच्या भेटीत शिक्षक मद्यधुंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2016 02:08 AM2016-09-17T02:08:06+5:302016-09-17T02:08:06+5:30
पंचायत समिती सभापतींनी शाळेत दिलेल्या भेटीत शिक्षक अति मद्यधुंद स्थितीत आढळून आले.
बोरटोला शाळेतील प्रकार : केशोरी पोलीस ठाण्यात केला पंचनामा
इसापूर : पंचायत समिती सभापतींनी शाळेत दिलेल्या भेटीत शिक्षक अति मद्यधुंद स्थितीत आढळून आले. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोरटोला (भरनोली) येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत गुरूवारी (दि.१५) भरदुपारी २.४५ वाजतादरम्यानचा हा प्रकार आहे. यावर त्या शिक्षकाला केशोरी पोलीस ठाण्यात नेवून पंचनामा करण्यात आला.
पंचायत समिती यांच्या समवेत अरविंद शिवणकर व त्यांच्या सोबत सहा. गटविकास अधिकारी, केंद्रप्रमुख, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक गावडे, पं.स. सदस्य रामलाल मुंगणकर, विस्तार अधिकारी अनुप भावे, सहायक खंडविकास अधिकारी अंदुलकर यांनी गुरूवारी (दि.१५) दुपारी बोरटोला शाळेला भेट दिली. याभेटीत शाळेतील सहायक शिक्षक डी.एम.लोणारे हे अति मद्यधुंद्य स्थितीत आढळले. विशेष म्हणजे सभापती शिवणकर यांच्या भेटपूर्वी केंद्रप्रमुख वाय.बी.येल्ले यांनी शाळेला भेट दिली होती. मात्र त्यांना शिक्षक लोणारे मद्यधुंद स्थितीत कसे आढळून आले नाही यातून केंद्रप्रमुखच त्यांना पाठीशी घालत असल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान शिक्षक लोणारे यांना केशोरी पोलीस ठाण्यात नेवून पंचनामा करण्यात आला. यापूर्वी तालुक्यातील राजोली, भरनोली येथील शाळा बंद तर इसापूर येथील प्र. मुख्याध्यापक फुलबांधे हे सुद्धा रस्त्यावर दारू पिऊन झिंगाट करीत असल्याचे आढळून आले होते. तोच काही दिवसानंतर हा प्रकार घडल्याने तालुक्यात झिंगाट शिक्षकांचा पेव तर फुटला नाही ना? असे दिसून येत आहे. गावातील पालकांनी या शिक्षकाचा हा नेहमीचाच प्रकार असून मुलांचे शाळेत जाणे बंद झाले असून शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे सभापतींना सांगितले. एवढेच नव्हे तर हा शिक्षक विचारलेल्या प्रश्नांचे बरोबर उत्तर देऊनही विद्यार्थ्यांना मारझोड करीत असल्याचेही समोर आले आहे. (वार्ताहर)