शिक्षकांना निवडश्रेणी व चटोपाध्याय वेतनश्रेणीचा लाभ मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:19 AM2021-06-27T04:19:33+5:302021-06-27T04:19:33+5:30
गोंदिया : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक निवडश्रेणी व चटोपाध्याय वेतनश्रेणीचा लाभ मिळावा यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने जिल्हा ...
गोंदिया : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक निवडश्रेणी व चटोपाध्याय वेतनश्रेणीचा लाभ मिळावा यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. यावर त्यांनी जिल्ह्यातील शिक्षकांना निवडश्रेणी व चटोपाध्याय वेतनश्रेणीचा लाभ मिळणार असल्याचे आश्वासन दिले.
प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांचे निवेदन उपमुख्य कार्यकारी अधिकारी भांडारकर यांना देऊन चर्चा केली. चर्चेत, जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक निवडश्रेणी व चटोपाध्याय वेतनश्रेणीच्या लाभापासून वंचित आहे. काही शिक्षक तर सेवानिवृत्त सुद्धा झाले असल्याचे सांगण्यात आले. तेव्हा या वेतनश्रेणीचा लाभ अवलंब मिळवून देण्याची मागणी करण्यात आली असता निश्चितपणे ही मागणी लवकरात लवकर निकालात काढण्याची हमी भांडारकर यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिली. यासोबतच विज्ञान विषय शिक्षक व उच्चश्रेणी मुख्याध्यापकांची रिक्त पदे भरण्याची मागणी करण्यात आली व शिक्षक पदोन्नतीपासून वंचित असल्याचेही सांगण्यात आले. तेव्हा याबाबतीत परिपूर्ण प्रस्ताव शिक्षण विभागाकडून बोलावून रिक्त पदे भरण्यात येतील, असे भांडारकर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सन २००९ नंतर सेवेत लागलेल्या शिक्षकांना कायम करण्याचा प्रस्ताव लवकरच मंजूर करण्याचे मान्य केले व विषय शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करण्याचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केल्याचे सांगितले. यासह अन्य मागण्यांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेला संघटनेचे जिल्हा नेते आनंद पुंजे, अध्यक्ष डी. टी. कावळे, सरचिटणीस एस. यू. वंजारी व गोंदिया तालुका नेते राजू रहांगडाले उपस्थित होते.