मानवाच्या कल्याणासाठी बुद्धाची शिकवण आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2016 02:59 AM2016-10-19T02:59:20+5:302016-10-19T02:59:20+5:30
तथागत गौतम बुध्दांनी मानवाला माणूस म्हणून जगण्याचे तत्वज्ञान देवून विश्वशांतीचा संदेश दिला.
राजकुमार बडोले : आचार्य निवास लोकार्पण सोहळा
गोंदिया : तथागत गौतम बुध्दांनी मानवाला माणूस म्हणून जगण्याचे तत्वज्ञान देवून विश्वशांतीचा संदेश दिला. मानवाचे कल्याण होण्यासाठी समाजाला तथागत बुध्दाच्या शिकवणुकीची आज गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
रविवारी १६ आॅक्टोबर रोजी डव्वा-पळसगाव जवळील सम्यक संकल्प बुध्दकुटी येथील आचार्य निवास लोकार्पण सोहळ्याचे उदघाटक म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी तहसीलदार विठ्ठल परळीकर होते. या वेळी पं.स. सदस्य राजेश कठाणे, सेवानिवृत्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोहर चंद्रिकापुरे, धम्मकुटीचे सचिव सतेंद्रनाथ तामगाडगे, ग्रामपंचायत सदस्य आनंदराव जोशी, चंद्रशेखर सुखदेवे, सुखदास मेश्राम व हिरालाल टेंभूर्णे यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती.
ना. बडोले म्हणाले, तथागत गौतम बुध्दांनी अहिंसक तत्वाने त्यागाची शिकवण देवून जग जिंकले आहे. बुध्दाच्या तत्वज्ञानात जगाचे कल्याण करण्याची क्षमता सामावलेली आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, बुध्दाने जगाला शांतीचा मार्ग दाखिवण्याचे तत्वज्ञान दिले. बुध्दाने सांगितलेल्या पंचशील तत्वाचे आपण आचरण करु न अष्टांग मार्गाचा अवलंब करावा. त्यासाठी प्रत्येकाचे आचरण शुध्द असले पाहिजे, असे सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने बुध्दकुटीच्या विकासासाठी ५० लाख रूपये मंजूर करण्यात आले असे सांगून ते पुढे म्हणाले, या बुध्दकुटीमध्ये माणसे घडविण्याचे काम झाले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला तथागत बुध्दाचा धम्म दिला. हा धम्म प्रत्येकाने आचरणात आणावे. त्यामुळे समाजाचा नक्कीच उध्दार होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
चंद्रिकापुरे म्हणाले, चीन व जपान हे दोन्ही बौध्दमय राष्ट्र आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्व धर्माचा अभ्यास करु न स्वातंत्र्य, समता, बंधुता ही उदात्त मूल्य देणाऱ्या बौध्द धर्माचा स्वीकार केला. या त्रिसूत्रीवर आधारित सौहार्दपूर्ण समताधिष्ठीत समाजाची निर्मिती करण्याच्या ज्या व्यापक उद्देशातून बाबासाहेबांनी हा धर्म स्वीकारला त्याचे आचरण करण्याची आज खरी गरज आहे. जीवनात प्रत्येकाने भगवान बुध्दाच्या मार्गावर जगण्याचा प्रयत्न करावा. तसेच बाबासाहेबांचे विचार आचरणात आणून नीतीमान समाज निर्मितीचे काम करावे, असे सांगितले.
परळीकर म्हणाले, धम्मकुटी म्हणजे माणूसकीची शिकवण देणारे ज्ञानपीठ आहे. इथले निसर्गरम्य वातावरण आल्हाददायक आहे, असे सांगितले. या वेळी राजेश कठाणे व जितेंद्र उके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक भदंत संघ धातु यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी सांगितले की, १० मार्च २००८ रोजी या धम्मकुटीचा उदय झाला. या माध्यमातून समाजाला योग्य दिशा देवून भावी पिढी घडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. संचालन राजू मेश्राम यांनी केले. उपस्थितांचे आभार रमेश बडोले यांनी मानले. कार्यक्रमास भदंत पैय्याश्री, सुजितकुमार बोदिले, राजेश खोब्रागडे, तसेच सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)