केशोरी पोलीस उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:26 AM2021-04-12T04:26:53+5:302021-04-12T04:26:53+5:30
केशोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथे शनिवार व रविवारला पूर्ण संचारबंदी करून इतर दिवशी मात्र जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरु ठेवण्याचा ...
केशोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथे शनिवार व रविवारला पूर्ण संचारबंदी करून इतर दिवशी मात्र जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरु ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. या निर्णयाला साथ देऊन पोलीस रस्त्यावर उतरले असून, त्यांनी दररोज वाहनांची तपासणी करणे सुरु केली आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कठोर निर्बंध लागू करण्याची कारवाई तालुका प्रशासनाने केली आहे. त्यानुसार, ठाणेदार संदीप इंगळे यांनी पोलीस पथकासह रस्त्यावर उतरुन येणाऱ्या - जाणाऱ्या वाहनधारक व वाहनांची तपासणी सुरु केली आहे. त्यांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला जात असून, तोंडावर नेहमी मास्क लावणे, सीटबेल्ट लावणे, शारीरिक अंतर पाळणे, साबणाने वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे इत्यादी गोष्टींचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच नियम मोडणाऱ्या वाहनधारकांकडून ५०० रुपये दंड वसुलीची कारवाई करण्यात येत असल्याचे ठाणेदार इंगळे यांनी सांगितले.