विमुक्त भटक्या जमातीचा तहसीलवर मोर्चा
By admin | Published: March 1, 2016 01:08 AM2016-03-01T01:08:14+5:302016-03-01T01:08:14+5:30
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त समता व सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी संघर्ष वाहिनी ...
शेकडोंचा सहभाग : विविध मागण्यांसाठी शासनाला साकडे
अर्जुनी-मोरगाव : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त समता व सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी संघर्ष वाहिनी भटके विमुक्त संघर्ष परिषद नागपूरच्या अर्जुनी-मोरगाव शाखेकडून सोमवारी तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोठा मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेकडो समाजबांधव सहभागी झाले होते.
हा मोर्चा श्रीकृष्ण राईस मिल येथून निघून जुने बस स्थानक मार्गाने तहसील कार्यालयावर नेण्यात आला. तहसील कार्यालयात सभा घेण्यात आली.
यावेळी वक्त्यांनी समाजबांधवाना मार्गदर्शन केले. यावेळी यशवंत दिघोरे, शालीकराम भोयर, सदाशिव मेश्राम, नारायण मेश्राम, हिवराज बावणे, काशीराम कोल्हे, गोपाल सोनवाने, प्रभाकर सोनटक्के, कालीदास बावणे यांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन तहसीलदार बोम्बर्डे यांना दिले. (तालुका प्रतिनिधी)
या मागण्यांचा समावेश
विमुक्त भटक्या जमातींना ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिकांमध्ये ११ टक्के स्वतंत्र आरक्षण द्यावे, राज्याच्या अर्थसंकल्पात विमुक्त भटक्यांच्या लोकसंख्या प्रमाणात विशेष आर्थिक तरतुद करणे, मच्छीमार संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आर्थिक सहाय्य, मच्छीमारांना २०० दिवस हाताला काम व विकासाच्या योजना लागू करणे, भूमीहिनांना पडिक जमिनी, बेरोजगारांना व्यावसायिक प्रशिक्षण, कर्ज व बेघरांसाठी घरकुल योजना लागू करणे, क्रिमीलेअरची जाचक अट रद्द करणे, एस.सी.,एस.टी.च्या धर्तीवर जिल्हास्तरावर वसतिगृहे सुरू करणे आदी मागण्यांचा समावेश आहे.
मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी
मोर्चेकरी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पोहोचले त्यावेळी पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले हे तहसीलदारांच्या केबिनमध्ये बसले होते. मोर्चाते नेतृत्व करणारी मंडळी मंत्री येत आहेत, आपण शांत बसा, असे जमावाला सांगत होती. मात्र पालकमंत्री मोर्चेकऱ्यांना सामोरे न जाता निघून गेले. त्यांच्या सहकार्याने आमचा लढा शासन दरबारी पोहोचविण्याचा मानस होता, असे सांगून मोर्चेकऱ्यांनी नाराजीचा सूर व्यक्त केला.