तहसील कार्यालयाच्या इमारतीला तडे ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:34 AM2021-09-24T04:34:10+5:302021-09-24T04:34:10+5:30
आमगाव : २ वर्षांपूर्वी महसूल विभागाला हस्तांतरित केलेल्या तहसील कार्यालयाच्या इमारतीच्या भिंतीना भेगा पडल्या असून तळाचा बेस बरोबर नसल्याने ...
आमगाव : २ वर्षांपूर्वी महसूल विभागाला हस्तांतरित केलेल्या तहसील कार्यालयाच्या इमारतीच्या भिंतीना भेगा पडल्या असून तळाचा बेस बरोबर नसल्याने खड्डे पडले आहेत. अशात बांधकाम विभाग व कंत्राटदाराच्या मिलीभगतमुळे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याची चर्चा आहे.
येथील तहसील कार्यालयाची जुनी इमारत जीर्ण झाली होती. त्यात दिवसेंदिवस कामाचा वाढता व्याप आणि जागाही अपुरी पडत होती. परिणामी शासनाने देवरी रोडवरील प्रशस्त जागेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करून इमारत बांधली. सन २०१९ मध्ये या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने ऑगस्ट २०१९ पासून सर्व सोयीनीयुक्त ही इमारत महसूल विभागाला हस्तांतरित केली. मात्र, २ वर्षांतच या इमारतीच्या काही भिंतींना भेगा पडलेल्या आहेत. तळमजल्यावरील काही खोल्यांतील टाईल्स लावलेल्या जमिनीवर खड्डे पडले आहेत. बेस बरोबर केला नसल्याने टाईल्स लावल्यानंतर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. इमारतीला जागोजागी तडे पडल्यामुळे भविष्यात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. ही इमारत बांधकाम विभागाच्या देखरेखीत तयार करण्यात आली व कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, २ वर्षांतच जर इमारतीच्या भिंतींना भेगा पडल्या व तळाशी खड्डे पडले असतील तर खरोखरच बांधकाम किती दर्जेदार आहे हा प्रश्न निर्माण होत आहे.
...........
गुणवत्तेकडे दुर्लक्ष
या इमारत बांधकामावर ज्या शाखा अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली होती त्या अभियंत्याने खरोखरच गुणवत्तेकडे लक्ष दिले काय व कंत्राटदाराने उत्कृष्ट दर्जाचे काम केले काय अशा प्रश्न इमारतीची स्थिती बघून पडतो. इमारत बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले असावे अशी चर्चा असून या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठांकडून चौकशी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.