तहसीलदार, नायब तहसीलदार मिळेना! कामे कशी होतील हे कळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:29 AM2021-09-19T04:29:30+5:302021-09-19T04:29:30+5:30
विलास शिंदे देवरी : महसूल प्रशासनाची महत्त्वाची पदे रिक्त असल्याने देवरी तालुक्याचा कारभार सध्या प्रभारींच्या भरोशावर सुरू आहे. परिणामी ...
विलास शिंदे
देवरी : महसूल प्रशासनाची महत्त्वाची पदे रिक्त असल्याने देवरी तालुक्याचा कारभार सध्या प्रभारींच्या भरोशावर सुरू आहे. परिणामी महसूल विभागाशी संबंधित कामे रेंगाळली असल्याने नागरिकांना याचा फटका बसत आहे. मात्र, याकडे लोकप्रतिनिधींचे सुद्धा दुर्लक्ष झाल्याने तालुकावासीयांची समस्या कायम आहे.
तालुक्याच्या ठिकाणी मागील दीड महिन्यापासून तहसीलदारांचे पद रिक्त आहे. तहसीलदार विजय बोरुडे यांची भामरागडला बदली झाल्यापासून येथे नवीन तहसीलदारांची नियुक्ती झालीच नाही. दुसरीकडे दोन नायब तहसीलदारांची पदेसुद्धा रिक्त असल्याने महसूल विभागाची कामे कशी पूर्ण होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सर्वात मोठी समस्या चिचगड येथील अप्पर तहसील कार्यालयाची आहे. येथे मागील एक वर्षापासून तहसीलदारच नसल्याने लोकांची कामे खोळंबली आहेत. ककोडी व चिचगड क्षेत्रातील लोकांना २० ते ४० किलोमीटर अंतर कापून देवरी येथे यावे लागत असल्याने मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्राच्या शेवटच्या टाेकावर असलेल्या देवरी तालुक्यात अधिकारी नोकरी करायलाच तयार नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याकडे लोकप्रतिनिधींचेही पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.
................
देवरीच्या तहसीलदारांना मिळाला न्याय
सात वर्षे नक्षलग्रस्त तालुक्यात तहसीलदार म्हणून सेवा देणाऱ्या देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे यांची पुन्हा भामरागड (जि. गडचिरोली) येेथे बदली झाल्याने बोरुडे यांनी महसूल प्रशासनाकडे धाव घेत न्याय देण्याची मागणी केली. नियमानुसार सात वर्षे नक्षलग्रस्त भागात सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांची ऐच्छिक ठिकाणी बदली व्हायला पाहिजे. परंतु असे न होता राजनितीक दबावाखाली त्यांची बदली भामरागड येथे केल्याची चर्चा होती. तब्बल ४२ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर विजय बोरुडे यांना १७ सप्टेंबर रोजी नाशिक महसूल विभागातील कोपरगाव (जि. अहमदनगर) येथे तहसीलदार म्हणून बदलीचा आदेश मिळाल्याची माहिती आहे.
........
अप्पर तहसील कार्यालयाचा दर्जाच का दिला !
चिचगड येथील अप्पर तहसील कार्यालयाची आहे. येथे मागील एक वर्षांपासून तहसीलदारच नसल्याने लोकांची कामे खोळंबली आहेत. ककोडी व चिचगड क्षेत्रातील लोकांना २० ते ४० किमी अंतर पार करुन देवरी येथे यावे लागत असल्याने मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे चिचगडला अप्पर तहसील कार्यालयाचा दर्जा का दिला असा सवाल केला जात आहे.