दूरदर्शन गाजवलेला ढोलकीवादक करतोय रंगरंगोटीची कामे; कोरोनामुळे उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 12:11 PM2020-09-21T12:11:04+5:302020-09-21T12:12:36+5:30
आपल्या मातीचा इमान राखून आणि प्रबोधनात्मक कलेमधून लोककला दंडार वाजवत, परंपरा जोपासलेल्या दादाजी मेश्राम यांची ढोलकी आता बंद झाली आहे. वृद्ध कलावंत मानधनापासून वंचित, तसेच उपासमारीची वेळ आली असल्याची व्यथा त्यांनी बोलून दाखविली आहे.
मुन्नाभाई नंदागवळी
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: एकेकाळी दूरदर्शनवर आपले अधिराज्य गाजवलेली लोककलेचा वारसा जपणारी ढोलकी कोरोनामुळे मूक झाली आहे. आपल्या मातीचा इमान राखून आणि प्रबोधनात्मक कलेमधून लोककला दंडार वाजवत, परंपरा जोपासलेल्या दादाजी मेश्राम यांची ढोलकी आता बंद झाली आहे. वृद्ध कलावंत मानधनापासून वंचित, तसेच उपासमारीची वेळ आली असल्याची व्यथा त्यांनी बोलून दाखविली आहे.
बाराभाटीचे दादाजी रुका मेश्राम हे संत गजानन महाराज दंडार मंडळात उत्कृष्ठ ढोलकीची थाप वाजवतात, या ढोलकीच्या सुरमयी वाजवण्याने गुजरात, शिल्पग्राम उत्सव उदयपूर, मुंबई दुरदर्शन, पुणे, सातारा, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपुर अशा ठिकाणासह आकाशवाणीवरही या मंडळाची दंडार सादर झाली, या दंडारीला उत्तम ढोलकीची दादाजी मेश्राम यांनी साद दिली. या ढोलकीच्या तालावर महाराष्ट्र राज्यासोबतच दुसरे राज्याचीही वेगळी ओळख निर्माण झाली ही मोठी गौरवाची बाब आहे.
दादाजी मेश्राम हे लहान वयापासूनच ढोलकी वाजविण्यात पारंगत आहेत. पण अशा वैविध्यपुर्ण कलाकाराने उच्च स्तर गाठला. मेश्राम यांनी गावातील मंदिरात भजन या कलाप्रकारामध्ये प्रथम ढोलकीची थाप रसिकांना दाखविली, आणि नंतर यांच्या ढोलकी वादणाला किर्तन, तमाशा, संतसंग कार्यक्रम, दिंडी व दंडारीतून रंग चढला. गुजरातमध्ये आजही ही ढोलकी रसिकांना आवडते आहे.
मेश्राम हे हल्ली भागवत सप्ताहामध्ये रंगरंगोटी करतात. हरिपाठ मृदुंग, लष्करी लावणी, श्रृंगारी लावणी, ऐतिहासिक लावणी, रामायणी लावणी, भारुळ अशा लोककला प्रकारामध्ये ढोलकीचा साज चढवून आपली ढोलकी मुबंईसह दुरदर्शनपर्यंत पोहोचवली. पण कोरोनामूळे सहा महिन्यांपासून कार्यक्रम नाही. ६५ वर्षांचे असून २०१६ ला आवेदन पत्र सादर करुन वृद्ध कलावंत मानधनसुद्धा लागू झाले नाही.
कोरोनाच्या प्रभावाने राज्यातील अनेक भागातील कलाकारांवर कार्यक्रम आर्थिक संकट आले, शासनाला कलावंताच्या कलेची विसर पडू नये, ज्याप्रमाणे चित्रपट व सिनेसृष्टीचे कार्य सुरु केले तसेच गावकुसातील हौशी कलावंताची दखल घ्यावी व कलाकारांची उपासमारी दूर करावी, तरच सांस्कृतिक महाराष्ट्र पुन्हा घडेल. अजूनही वृद्ध कलावंत मानधन सुरु नाही झाले, कोरोनामुळे उपासमारीची परिस्थिती आहे, शासनाने लवकर उपाय सोधून उपासमारी दूर करावी.
- दादाजी रुका मेश्राम
दंडार ढोलक कलावंत, बाराभाटी.