माय-बाप तुम्हीच सांगा राहायचे कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:33 AM2021-09-12T04:33:11+5:302021-09-12T04:33:11+5:30
खातिया : विमानतळाच्या जागेत असलेले अतिक्रमण काढण्यात आल्याने, बेघर झालेल्या १०-१५ कुटुंबीयांनी आपला डेरा ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर मांडला ...
खातिया : विमानतळाच्या जागेत असलेले अतिक्रमण काढण्यात आल्याने, बेघर झालेल्या १०-१५ कुटुंबीयांनी आपला डेरा ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर मांडला आहे. फेब्रुवारी महिन्यापासून ते झोपड्या बांधून तेथे राहत असून, आता बघता-बघता ६-७ महिन्यांचा काळ लोटत आहे. असे असतानाही एखाद्या लोकप्रतिनिधी वा प्रशासनाने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. यामुळे या कुटुंबीयांनी आता प्रशानसनाकडे हाक मारली असून, माय-बाप तुम्हीच सांगा राहायचे कुठे, असा सवाल केला आहे.
बिरसी येथील विमानतळाच्या जागेत मागील २५-३० वर्षांपासून राहत असलेल्या १०-१५ कुटुंबीयांचे अतिक्रमण २४ फेब्रुवारी रोजी विमानतळ प्रशासनाच्या वतीने आले. त्यामुळे बेघर झालेल्या कुटुंबीयांना राहण्यासाठी जागा उरली नाही व अशात त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर झोपड्या टाकून तेथेच आपला डेरा मांडला. आता याला सुमारे ६-७ महिन्यांचा कालावधी टोलत असतानाही एकाही लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाने लक्ष दिले नाही. पावसाळ्यात त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड देत दिवस काढावे लागत आहे. त्यांच्या लहान-लहान मुलाबाळांच्या जीवालाही धोका आहे. मात्र, त्यांची दखल घेण्यासाठी कुणीही पुढे आलेले नाही. अशात त्यांनी प्रशासनालाच आता राहायचे कोठे, असा सवाल केला आहे. डोक्यावर हक्काचे छत मिळावे, अशी त्यांची मागणी आहे.