नवतपातही तापमान ४० डिग्रीच्या आत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:22 AM2021-05-28T04:22:15+5:302021-05-28T04:22:15+5:30
गोंदिया : वर्षातील सर्वाधिक तापणारे ९ दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवतपाला मंगळवारपासून (दि. २५) सुरुवात झाली आहे. मात्र, नवतपातही ...
गोंदिया : वर्षातील सर्वाधिक तापणारे ९ दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवतपाला मंगळवारपासून (दि. २५) सुरुवात झाली आहे. मात्र, नवतपातही जिल्ह्याचे तापमान ४० डिग्रीच्या आत असतानाही उकाड्याने मात्र जिल्हावासीय हैराण झाले आहेत. कधी ढगाळ वातावरण तर कधी ऊन असे सध्याचे चित्र असून सर्वांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत.
यंदाचा उन्हाळा तसा ढगाळ वातावरण व पावसाने दिलासादायक करून दिला. त्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच ढगाळ वातावरण व पावसाने हजेरी लावल्याने महिना तेवढा भारी गेला नाही. मात्र, मंगळवारपासून (दि. २५) नवतपाला सुरुवात झाली आहे. नवतपा म्हणजे वर्षातील सर्वाधिक तापणाऱ्या ९ दिवसांचा हा काळ असतो. यावरून नवतपात तापमान किती राहणार याचा अंदाज लावता येतो. मात्र, सध्या ढगाळ वातावरण असल्याने नवतपातही जिल्ह्याचे तापमान ४० डिग्रीच्या आतच नोंदले जात आहे. असे असले तरीही उकाड्याने मात्र जिल्हावासीय हैराण होत आहेत. अशात आता त्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून कधी वरूणराजा बरसतो याचीच ते वाट पाहत आहेत.
-----------------------
शेतकरी हंगामाच्या तयारीला
७ जूनपासून मान्सून लागणार असल्याने आता शेतकरीही पावसाची वाट बघत आहेत. पाऊस पडला रे पडला की शेतकरी आपल्या शेतात राबण्यास तयार आहेत. पावसाने धरणीची तहान भागविली की शेतकरी त्यातून सोने काढणार. यामुळेच शेतकरी खरिपाच्या तयारीला लागला असून पावसाची वाट बघत आहे.