जंगल सफारीचा मोह वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 06:00 AM2019-11-13T06:00:00+5:302019-11-13T06:00:30+5:30
गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र म्हणून १२ डिसेंबर २०१३ रोजी राज्यातील पाचवे व्याघ्र राखीव क्षेत्र अस्तीत्वात आले आहे. यात नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नवेगाव अभयारण्य, नागझिरा अभयारण्य, नवीन नागझिरा अभयारण्य व कोका अभयारण्य अशा एकूण चार अभयारण्य व एका राष्ट्रीय उद्यानाचा समावेश आहे. याचे क्षेत्रफळ ६५६.३६ चौरस किमी. एवढे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्याला वरदान म्हणून लाभलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघोबाच्या दर्शनासाठी पर्यटकांची एकच गर्दी बघावयास मिळत आहे. यातून नागरिकांचा कल आता शहरातील सिमेंट-कॉँक्रीटचे जंगल सोडून जंगलातील विसावा व वन्यप्राणी दर्शनाकडे वाढत असल्याचे दिसून येत आहे. हेच कारण आहे की, प्रकल्प उघडताच आॅक्टोबर महिन्यात १२९८ पर्यटकांनी जंगल सफारी केली आहे.
गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र म्हणून १२ डिसेंबर २०१३ रोजी राज्यातील पाचवे व्याघ्र राखीव क्षेत्र अस्तीत्वात आले आहे. यात नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नवेगाव अभयारण्य, नागझिरा अभयारण्य, नवीन नागझिरा अभयारण्य व कोका अभयारण्य अशा एकूण चार अभयारण्य व एका राष्ट्रीय उद्यानाचा समावेश आहे. याचे क्षेत्रफळ ६५६.३६ चौरस किमी. एवढे आहे.
विशेष म्हणजे वाघोबाचे हमखास दर्शन होत असल्याने पर्यटकांची येथे नेहमीच गर्दी असते. त्यात आता व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाल्याने याची राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीयस्तरावर ख्याती आहे.
व्याघ्र प्रकल्प जिल्ह्याला लाभलेले एक वरदानच आहे. त्यात आजघडीला धकाधकीच्या जीवनात थोडा विसावा मिळावा यासाठी सिमेंट- कॉँक्रीटचे जंगल सोडून नागरिकांचा कल निसर्गाच्या सानिध्याकडे दिसून येत आहे. म्हणूनच व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. विशेष म्हणजे, सध्या सुटींचा आनंद लुटण्यासाठी नागरिक जंगल सफारीला पसंती देत असल्याचेही दिसून येते. यामुळेच व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी करणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढतच चालली आहे.
यंदा, पावसाळ््यानंतर प्रकल्प उघडताच फक्त ऑक्टोबर महिन्यात १२९८ पर्यटकांनी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली आहे.
या आकडेवारीत मोठ्यांचा समावेश असतानाच १३३ पर्यटक १२ वर्षाखालील असून यातून चिमुकल्यांना वन व वन्यजिवांप्रती आवड निर्माण होत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.
वन्यजीव विभागाला १.२३ लाखांचे उत्पन्न
लोकांना वन व वन्यजीव याबाबत आवड व आपुलकी निर्माण व्हावी या दृष्टीकोनातून वन विभागाकडून पर्यटकांना व्याघ्र प्रकल्पात प्रवेश दिला जात आहे. सहाजीकच यासाठी शुल्क आकारले जाते. यातूनच वन विभागाला या पर्यटकांकडून फक्त आॅक्टोबर महिन्यातच एक लाख २३ हजार ७५० रूपयांचे आर्थिक उत्पन्न झाले आहे.