गोंदियातल्या शाळेच्या इमारतीवर वीज पडून 10 विद्यार्थी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 06:50 PM2017-10-05T18:50:25+5:302017-10-05T18:50:33+5:30
जि. प. प्राथमिक शाळेच्या इमारतीवर वीज कोसळल्याने वर्गातील १० विद्यार्थी जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि.५) दुपारच्या सुमारास गोंदिया तालुक्यातील एकोडी येथे घडली.
एकोडी (गोंदिया) : जि. प. प्राथमिक शाळेच्या इमारतीवर वीज कोसळल्याने वर्गातील १० विद्यार्थी जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि.५) दुपारच्या सुमारास गोंदिया तालुक्यातील एकोडी येथे घडली. गुरुवारी दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. दरम्यान जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवर वीज पडली. ज्या खोलीवर वीज पडली तेथे इयत्ता पहिल्या वर्गाचे वर्गाचे एकूण ४७ विद्यार्थी बसले होते. यात दहा विद्यार्थी जखमी झाले.
जखमीपैकी २ विद्यार्थी गंभीर जखमी झाले तर आठ विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. इमारतीवर वीज कोसळल्याने कवेलूचे तुकडे पडून विद्यार्थ्याना दुखापत झाली. या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थी काही वेळ गोंधळून गेले होते. वीज पडल्याचा आवाज होताच विद्यार्थी वर्गातून सैरावैरा पडू लागले. ज्या खोलीत विज पडली तेथील विद्युत सामानाचे देखील नुकसान झाले. दरम्यान शिक्षकांनी वेळीच प्रसंगावधान दाखवित जखमी विद्यार्थ्यांना तातडीने एकोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉ. एन.जी.अग्रवाल व इतर वैद्यकीय अधिका-यांनी विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार केले.
दरम्यान जखमी सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. जखमी विद्यार्थ्यांमध्ये रेहान कलाम शेख, अरपीत हेतराम पटले, साक्षी अशोक ढोमणे, दुर्गेश सुरेश टेंभरे, आर्ची नंदकिशोर बिसेन, सीया मोहनलाल बावनकर, विक्की संजय रहांगडाले, लव गिरीधारी अंबुले, अन्नपूर्णा गजेंद्र रहांगडाले, लक्की धनपाल हरिणखेडे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
पालकांनी घेतली शाळेकडे धाव
जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवर विज कोसळून विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती गावात माहिती होताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेकडे धाव घेतली. तसेच शिक्षकांना गाठून आपला पाल्य सुरक्षित असल्याची खात्री करुन घेतली. तर अनेक पालक विद्यार्थ्यांना घरी घेवून गेले.
विद्यार्थ्यांसह शिक्षकही हादरले
वीज पडल्यानंतर वर्गात मोठ्या प्रमाणात धुर पसरल्याचे वर्ग शिक्षक के.के. हरिणखेडे यांनी प्रतिनिधीशीे बोलताना सांगितले. दुपारी २ ते २.३० वाजता दरम्यान विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. याच दरम्यान वर्गखोलीच्या एका बाजुला विज पडली. यात दहा विद्यार्थी जखमी झाले. विज पडल्यानंतर पाच ते दहा मिनिटे काय करावे हेच सुचत नव्हते. दरम्यान या प्रकारामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षक हादरल्याचे हरिणखेडे यांनी सांगितले.