दहा हजारावर विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 09:26 PM2019-06-15T21:26:19+5:302019-06-15T21:26:40+5:30

दहावीनंतर विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागू नये यासाठी शासनाच्या मॅट्रिकेत्तर शिष्यवृत्ती व इतर योजनातंर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र कायम विनाअनुदानित विद्यालयातील विद्यार्थ्यांना या योजनांची माहिती दिली जात नसल्याने जिल्ह्यातील दहा हजारावर विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहत असल्याची बाब पुढे आली आहे.

Ten thousand students are deprived of scholarship | दहा हजारावर विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

दहा हजारावर विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

Next
ठळक मुद्देकायम विनाअनुदानीत विद्यालय। माहितीचा अभाव, विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान, यंदा करणार जनजागृती

अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दहावीनंतर विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागू नये यासाठी शासनाच्या मॅट्रिकेत्तर शिष्यवृत्ती व इतर योजनातंर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र कायम विनाअनुदानित विद्यालयातील विद्यार्थ्यांना या योजनांची माहिती दिली जात नसल्याने जिल्ह्यातील दहा हजारावर विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहत असल्याची बाब पुढे आली आहे.
जिल्ह्यात अनुदानीत, कायम विना अनुदानीत आणि स्वंयअर्थसाह्यीत विद्यालय आहेत. यापैकी अनुदानीत विद्यालयात इयत्ता ११ आणि १२ वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनातंर्गत शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. मात्र कायम विनाअनुदानित विद्यालयातील विद्यार्थ्यांना विद्यालयाकडून शिष्यवृत्ती दिली जात असल्याची माहितीच दिली जात नसल्याने त्यांना शिष्यवृत्ती मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
जिल्ह्यात ११५ कायम विना अनुदानीत शाळा व विद्यालय असून यामध्ये १५ हजारावर विद्यार्थी शिक्षण घेत आहे. शासनाच्या निर्णयानुसार खुला प्रवर्ग वगळता इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रीकेत्तर शिष्यवृत्ती व इतर योजनातंर्गत ११ आणि १२ वीतील विद्यार्थ्यांना वार्षिक १८०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
यामुळे विद्यार्थ्यांना पाठपुस्तकांचा आणि शैक्षणिक खर्च भागविण्यास थोडीफार मदत होत असते. आर्थिक अडचणीमुळे एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये हा देखील शासनाचा या मागील हेतू आहे. मात्र कायम विनाअनुदानीत विद्यालयात इयत्ता ११ व १२ वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्तीच मागील तीन चार वर्षांपासून मिळत नसल्याची माहिती आहे.
लोकमतने याची खोलात जावून चौकशी केली असता कायम विना अनुदानीत शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांना सुध्दा या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती योजनांची माहिती नसल्याची बाब पुढे आली. त्यामुळेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यास ही विद्यालये असमर्थ ठरत आहे. पण याचा फटका जिल्ह्यातील विविध प्रवर्गातील १० हजारावर विद्यार्थ्यांना बसत असून बºयाच विद्यार्थ्यांना मोलमजुरी करुन शिक्षण घ्यावे लागत आहे.

सामाजिक न्यायमंत्र्यांच्या जिल्ह्यातच समस्या
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या गृह जिल्ह्यातच कायम विना अनुदानीत विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेच्या माहितीअभावी शिष्यवृत्ती मिळण्यापासून वंचित राहावे लागत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. हा प्रकार मागील दोन तीन वर्षांपासून सुरू असल्याची माहिती असून याकडे संबंधित विद्यालयाच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे सुध्दा याकडे दुर्लक्ष झाले आहे.
शिष्यवृत्ती योजनांपासून विद्यालय अनभिज्ञ
शासनातर्फे खुला प्रवर्ग वगळता इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविली जात आहे. शाळा, विद्यालय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या विविध योजना आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेतांना आर्थिक मदत होते. मात्र या योजनांची माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांनाच नसल्याची बाब पुढे आली आहे. याचा फटका मात्र विद्यार्थ्यांना बसत आहे.

बºयाच विद्यालयाच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांना शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेची माहिती नाही. त्यामुळे ही अडचण दूर करण्यासाठी यंदा यासाठी विशेष मार्गदर्शन शिबिर घेवून त्यात मुख्याध्यापक आणि शिक्षकांना शिष्यवृत्ती योजनांची माहिती दिली जाईल. एकही विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनांपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेवू.
- ए.पी.कछवे, शिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प.गोंदिया.स्वंयअर्थसहाय्यीत विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची तरतूद नाही. मात्र याही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी असा प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन असून लवकरच त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
- मंगेश वानखेडे, समाज कल्याण उपायुक्त गोंदिया.

पदवीचे शिक्षण घेताना अडचण
कायम विना अनुदानीत विद्यालयांमध्ये १२ वी पर्यंत शिक्षणाची सोय आहे. त्यानंतर पदवी शिक्षणासाठी दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो. तेव्हा विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करतात. मात्र ११ वी आणि १२ वी मध्ये शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेवू न शकल्याने विद्यार्थ्यांना महाविद्यालयात गेल्यावर आधी शिष्यवृत्तीचा लाभ का घेतला नाही याचा ठोस कारण द्यावे लागते. त्यामुळे मोठी अडचण होत असल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले.

Web Title: Ten thousand students are deprived of scholarship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.