मेडिकल इमारत बांधकामाची निविदा लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:29 AM2021-05-13T04:29:25+5:302021-05-13T04:29:25+5:30
गोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) इमारत बांधकामासाठी ६८९ कोटी रुपयांच्या खर्चाला राज्य सरकारने अलीकडेच मंजुरी दिली. त्यानंतर ...
गोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) इमारत बांधकामासाठी ६८९ कोटी रुपयांच्या खर्चाला राज्य सरकारने अलीकडेच मंजुरी दिली. त्यानंतर आता निविदा प्रक्रिया लवकर करून बांधकामाला सुरुवात करण्याबाबत मंगळवारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊन ५ ते ६ वर्षांचा काळ लोटल्यानंतरही प्रशासकीय इमारत बांधकामाचे प्रश्न कायमच होते. यासाठी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पुढाकार घेऊन इमारतीच्या बांधकामातील सर्व अडीअडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने सातत्याने पाठपुरावा केला. दरम्यान, इमारतीच्या वाढीव बांधकामासाठी अंदाज पत्रकानुसार निधी उपलब्ध करून देण्याकरिता खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्र्यांसह वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसोबत चर्चा करून वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात चर्चा केली होती. यामुळे राज्य शासनाने गोंदिया मेडिकल कॉलेजच्या इमारत बांधकामाच्या वाढीव प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी देत ६८९ कोटी ४६ लाख ८१ हजार रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र, काही तांत्रिक बाबीमुळे इमारतीच्या बांधकामाचे काम रखडले होते. इमारत बांधकामाला त्वरित सुरुवात व्हावी यासाठी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या विनंतीवरून मंगळवारी (ता.११) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यासह संबंधित विभागाचे सचिव उपस्थित होते. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामाच्या सर्व तांत्रिक बाबींवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, आर्किटेक्चर नियुक्त करून त्वरित बांधकामाच्या निविदा प्रसिद्ध करण्यात याव्यात, अशी सूचना करण्यात आली. यामुळे आता लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा होणार आहे. कुडवा येथील नियोजित ठिकाणी १५० विद्यार्थी क्षमतेचे तसेच जवळपास ४५० पेक्षा अधिक बेड क्षमतेची इमारत तयार करण्यात येणार आहे.
............
कुडवा येथील प्रशस्त जागेवर होणार सुसज्ज इमारत
गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊन पाच वर्षांचा कालावधी लोटला. मात्र, इमारतीचे बांधकाम न झाल्याने सध्या मेडिकलचा कारभार केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या इमारतीतून सुरू आहे. मात्र, जागेअभावी डॉक्टर व विद्यार्थ्यांनासुद्धा विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मात्र, आता कुडवा परिसरात सुसज्ज इमारत तयार होणार असल्याने ही समस्यासुद्धा मार्गी लागणार आहे.